मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची वैयक्तिक दुश्मनी नाही. ते केवळ आमचे राजकीय शत्रू आहेत. महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती आहे. आम्ही कोणाशीही व्यक्तिगत वैर करत नाही. उद्धव ठाकरे यांचं फडणवीसांना उद्देशून असलेलं, ‘एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहीन’, हे वक्तव्य केवळ राजकारणापुरतं मर्यादित होतं, असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मी कधीही चहासुद्धा प्यायला नाही. मी एक कडवट शिवसैनिक आहे, असे सांगत राऊत यांनी फडणवीस यांच्याशी पडद्यामागून चर्चा सुरु असल्याची शक्यता फेटाळून लावली.
दरम्यान माहीम विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांनी माघार घेतली तर ठाकरे गट आपला उमेदवार मागे घेणार का, असा प्रश्न राऊत यांना विचारला. त्यावर ते म्हणाले की, माहीममध्ये आमचा उमेदवार मागे घ्यायला तिकडे पंडित नेहरु उभे आहेत का? इंदिरा गांधी किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उभे आहेत? ज्यांच्यासाठी उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घ्यावा. तरुण मुलांना राजकारणात लढू द्या. त्यांना राजकारण घासून पुसून कळू द्या. त्यांना समजू द्या राजकारणात काय त्रास आहे तो. तरंच त्यांचं नेतृत्व उभं राहील. आम्ही काय राजकारणात सहजपणे इथपर्यंत आलो आहोत का? असंही राऊत म्हणाले.