ठाणे – ठाण्यातील सिंधुदुर्ग सामाजिक मंडळ व दिलीप बारटक्के यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा ३ ते १० नोव्हेंबर २०२४ दरम्यान सावरकरनगर येथे भव्य स्वरूपाच्या कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण महोत्सवाचे यंदा १७ वे वर्ष असून विविध प्रकारच्या कार्यक्रमांचा त्यात समावेश आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरनगर येथील ठा म पा शाळा क्रमांक १२० च्या मैदानात होणाऱ्या या महोत्सवात दररोज सायंकाळी सायं ६ ते रात्री ९:३० च्या दरम्यान रोज ५ पारंपरिक दशावतार नाटके, कोकणरत्न पुरस्कार, खेळ पैठणीचा, गुणवंत विद्यार्थी सत्कार, मुलांसाठी फनफेअर, कोकण खाद्यपदार्थांचे स्टॉल… अशांची मेजवानी असेल.
खाद्यपदार्थ स्टॉलवर झणझणीत म्हावरा, अस्सल चवीचो मालवणी मसालो, खडखडे लाडू, मालवणी खाजा, कुळदाची पिठी, सुकी मच्छी, मासे, कोकम, काजू, आंबा अशा विविध प्रकारच्या स्टॉलचा समावेश असणार आहे. या महोत्सव ठिकाणी विशेष आकर्षण म्हणजे मालवण तालुक्यातील साळेल-नांगरभाट गावातील श्री गिरोबा मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. या महोत्सवाला दरवर्षी दीड ते दोन लाख नागरिक, कोकणप्रेमी, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रांत कार्यरत असणारे, कलाकार भेट देतात. या महोत्सवात सादर होणाऱ्या पारंपरिक मालवणी दशावतार प्रयोगाला दरवर्षी तुफान गर्दी होत असते.
यंदा रविवारी ३ नोव्हेंबरला प्रेरणा कला संस्था निर्मित “मला काही सांगायचंय!” मी अनाथांचा नाथ एकनाथ हा नाट्यप्रयोग होईल.लेखक- डॉ.प्रा.प्रदीप ढवळ,रंगावृत्ती -अशोक समेळ, डॉ.प्रा.प्रदीप ढवळ, दिग्दर्शक- अशोक समेळ निर्माता- प्रा. मंदार टिल्लू, प्रमुख कलाकार- संग्राम समेळ.सोमवार ४ नोव्हेंबरला देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ, चेंदवण आयोजित ट्रिकसिनयुक्त महान पौराणिक “दशावतारी नाट्य प्रयोग क्षेत्रपाल श्री देव वेतोबा नाट्यप्रयोग होईल.५ नोव्हेंबरला लोकराजा, नटसम्राट कै. सुधीर कलिंगण प्रस्तुत, कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुर-कुडाळ आयोजित ट्रिकसिनयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग ‘व्यंकटेश पद्मावती’ सादर होईल. बुधवार ६ नोव्हेंबर रोजी सुधाकर दळवी प्रस्तुत चेंदवणकर-गोरे पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ कवठी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग आयोजित ‘मुंबईची मुंबादेवी’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होईल.
७ नोव्हेंबरला शरद मोचेमाडकर प्रस्तुत जय हनुमान पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, दांडेली, आरोस, ता. सावंतवाडी आयोजित पौराणिक नाट्यप्रयोग ‘विंद्यवासिनी विंदेश्वरी’ सादर होईल. ८ नोव्हेंबर रोजी भाई कलिंगण प्रस्तुत बाबी कलिंगण कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, कुडाळ आयोजित दशावतारी नाट्यप्रयोग ‘मुक्त झाली भानुमति’ सादर होईल. शिवाय, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा, खेळ पैठणीचा, भजनाची डबलबारी, महाराष्ट्राची लोकधारा लोकगीते आणि नृत्ये असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ‘या कोकण महोत्सवाक यवकच होया’, असे आवाहन सिंधुदुर्ग सामाजिक मंडळ व आयोजक दिलीप बारटक्के यांनी केले आहे.