पुणे – महासाधू मोरया गोसावी, संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा आदर्श पिंपरी चिंचवड शहराला आहे. हे सुसंकृत व कायदा आणि सुव्यवस्था पाळणाऱ्या सुजाण नागरिकांचे शहर आहे. या शहरामध्ये देशभरातून येऊन सर्व जाती, धर्माचे लोक कष्ट करून देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासात हातभार लावत आहेत. ज्येष्ठ नेत्या माधवी लता यांनी निवडणुकीच्या तोंडावर चिंचवड विधानसभा क्षेत्रात येऊन प्रक्षोभक वक्तव्य करू नये व सामाजिक वातावरण बिघडवू नये अशा आशयाचे पत्र ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी पोलीस आयुक्त यांना दिले आहे.
सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यभर वाहत आहेत. या काळात जाती धर्मावर आधारित प्रचार करून शहरातील सुसंस्कृत वातावरणास गालबोट लावण्याचा प्रकार काही व्यक्ती व पक्षांकडून होण्याची दाट शक्यता आहे. एका पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी शनिवारी (दि.२६) माधवी लता या चिंचवड विधानसभा क्षेत्रात येणार आहेत. सध्या निवडणूकीच्या तोंडावर अशा व्यक्तींनी बेजबाबदारपणे स्फोटक व गैर वक्तव्य केल्यास समाजात तेढ निर्माण होऊन सामाजिक प्रश्न उद्भवू शकतात, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यास प्रतिबंध घालणे कायद्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. या करिता माधवी लता यांना चिंचवड विधानसभा क्षेत्रात येऊन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करू नयेत अशी समज द्यावी अशी विनंती जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांना पत्राद्वारे केली आहे.