पुणे : पुण्यात भाजपच्या वतीने कोथरूड मतदार संघातून चंद्रकांत पाटील यांचं नाव चर्चेत असताना अमोल बालवडकर यांनीसुद्धा भाजपकडून विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावरून भाजपमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरु झाल्याचे दिसून आले होते. बालवडकर यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केला होता. मी कोथरूड मतदार संघातून इच्छुक असल्याने चंद्रकांतदादा माझ्यावर नाराज असल्याचे त्यांनी सांगितले होते. पक्षाने जर मला उमेदवारी नाही दिली, तर मग मला माझ्या जनतेसाठी वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असे सांगत बंडखोरीचा इशारा दिला होता. अखेर त्यांनी हा निर्णय मागे घेतल्याचे दिसून आले आहे.
कोथरूड मतदार संघात पाटील प्रचार करत असताना बालवडकर आणि त्यांची भेट झाली. त्यावेळी दोघांनी नाराजी बाजूला ठेवून एकमेकांना पेढा भरवत शुभेच्छाही दिल्या. यावरून अमोल बालवडकर यांनी माघार घेतल्याचे समजते आहे. बाहेरचा उमेदवार नको अशी वेळोवेळी भूमिका मांडूनही तिसऱ्यांदा चंद्रकांत पाटलांचीच उमेदवारी देण्यात आली. स्थानिक असलेले अमोल बालवडकर यांनी आपल्याला उमेदवारी न मिळल्यास बंडखोरी करण्याचे संकेत दिले होते.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बालवडकर यांच्या निवासस्थानी जात त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. यानंतरही यादीची वाट पाहू, असे वक्तव्य बालवडकर यांनी करत नाराजी कायम असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. भाजपाची पहिली यादी आली आहे. यामध्ये चंद्रकांत पाटलांचे नाव आहे. यामुळे बालवडकर बंडखोरीचा निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बावनकुळेंच्या भेटीनंतरही बालवडकर हे निवडणूक लढण्यावर ठाम होते. बालवडकर यांनी बंडखोरी केल्यास चंद्रकांत पाटलांची मोठी अडचण होण्याची शक्यता होती.