पुणे : बारामती विधानसभेचे महायुतीचे उमेदवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार शक्ती प्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सहयोग सोसायटी निवासस्थानी पत्नी सुनेत्रा पवार, बहिण विजया पाटील यांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर कसब्यातील छत्रपती शिवाजी महाराज, इंदापूर रस्त्यावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले. शहरातून मोठ्या रॅलीने ते प्रशासकीय भवनात दाखल झाले.तेथे निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे त्यांनी अर्ज सादर केला. जय पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, माळेगावचे अध्यक्ष केशवराव जगताप, सोमेश्वरचे पुरुषोत्तम जगताप, छत्रपतीचे प्रशांत काटे यांच्यासह राष्ट्रवादी व महायुतीतीलल अन्य घटक पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. तदनंतर कन्हेरी येथील मारुतीरायाचे दर्शन घेत पवार यांच्या प्रचाराची सुरुवात झाली.