सिंधुदुर्ग : युवकांसह हजारो महिलांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करीत भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांनी सावंतवाडी मतदारसंघातून आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी “विशालभाई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है..!!, आमदार नवो विशालच हवो…!! अशा घोषणा देण्यात आल्या. तत्पुर्वी त्यांनी सावंतवाडीतील उद्यानाच्या समोर उपस्थित चाहत्यांचा मेळावा घेवून सावंतवाडीच्या विकासासाठी आपल्या सोबत येथील जनतेने रहावे, अशी भावनिक हाक उपस्थितांना दिली.
भाजपाचे युवा नेते तथा बंडखोर उमेदवार विशाल परब यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ते माघार घेणार की निवडणुकीला सामोरे जाणार अशी चर्चा होती. या सर्व चर्चांना पुर्णविराम देत विशाल परब यांनी आपला उमेदवारी अर्ज हजारो समर्थकांच्या उपस्थितीत सादर केला. यावेळी सावंतवाडी उद्यान ते प्रांताधिकारी कार्यालय अशी त्यांची रॅली काढण्यात आली. यावेळी नव्या पर्वाचा नवा शिलेदार, आपल्या हक्काचा माणूस, नेता कडक कामगिरी धडक असे पोस्टर लावण्यात आले होते. यावेळी परब यांनी सपत्नीक शिवरामराजे भोसले, बापुसाहेब महाराज यांच्या पुतळ्याला नमन करुन आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे सासरे रविंद्र परब यांच्यासह प्रमिला पंडित, शुभांगी राणे आदी उपस्थित होते.
मी भाजपचा कार्यकर्ता मोदींचा फॅन, त्याच विचार मूल्यावर पुढचा प्रवास विशाल परब यांनी आज सावंतवाडी उद्यानाच्या परिसरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत सावंतवाडी मतदारसंघातील मतदारांची बैठक घेतली. त्यावेळी बोलताना परब म्हणाले, मी भाजपचा कार्यकर्ता मोदींचा फॅन आहे. त्यामुळे त्याच विचारमूल्यावर मी कार्यरत राहणार आहे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत काम केल्यामुळे मला एनर्जी मिळाली ती एनर्जी पुढे घेऊन मी मतदार संघात काम करणार आहे त्यामुळे तुमच्या हक्काच्या झिलाला तुम्ही बहुमताने निवडून विधानसभेत आमदार म्हणून पाठवा असे भावनिक आवाहन भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी केले. सावंतवाडी मतदार संघाचा आमदार म्हणून मला एक वेळेस संधी द्या मी कायम मतदारसंघात राहीन. माझ्यावर मोठमोठे दबाव आणण्याचे, तसेच धक्का तंत्र देण्याचे काम चालू आहे. मात्र विरोधकांना नमस्कार करतो. त्यांच्या विरोधात बोलणार नाही असे ते म्हणाले.