मुंबई : येथील मराठी वृत्तपत्र लेखक संघाने ४९ वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा जाहीर केली आहे. त्याचबरोबर राज्यस्तरीय दिवाळी अंक प्रदर्शनाचीही घोषणा करण्यात आली आहे. अनेक उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून १९४९ पासून सातत्याने कार्यरत असलेल्या आणि वृत्तपत्र लेखन चळवळीचे यंदा अमृतमहोत्सवी सांगता वर्ष साजरे करीत असलेल्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाने ही स्पर्धा जाहीर केली आहे. संस्थेतर्फे १९७६ पासून मराठी भाषेची वैभवशाली दिवाळी अंक प्रदर्शन परंपरा जपली जाते आहे. या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात आणि अमेरिकेत लॉस एंजेलीस येथे अंक पोहोचणार आहेत. या उपक्रमात गोरेगाव येथील मराठी विचारधारा प्रतिष्ठान, लॉस एंजेलीस येथील “मराठी संस्कृती.कॉम, एमसीएफ फाउंडेशन, मराठी कल्चरल अँड फेस्टिव्हल ही संस्था सहभागी होत आहे. स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही अंक येत असतात.
सर्वोत्कृष्ट अंकासाठी मनोरंजनकार का र मित्र स्मृती पुरस्कार तर आवाजकार मधुकर पाटकर पुरस्कृत सर्वोत्कृष्ट विनोदी अंक, साने गुरुजी स्मृती सर्वोत्कृष्ट मुलांचा अंक, सर्वोत्कृष्ट धार्मिक अंक, मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत वसंतराव होशिंग स्मृती महिला संपादित सर्वोत्कृष्ट अंक, कृष्णराव भानुसे स्मृती उत्कृष्ट दिवाळी अंक, पास्कोल लोबो पुरस्कृत गणेश केळकर स्मृती उत्कृष्ट अंक, मनोहरपंत चिवटे स्मृती सर्वोत्कृष्ट आरोग्यविषयक अंक यासह स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या अंकांचा उत्कृष्ट आणि उल्लेखनीय अंक म्हणून पारितोषिक देऊन मराठी भाषा दिनी २७ फेब्रुवारी गौरविण्यात येते. स्पर्धा आणि प्रदर्शनासाठी आलेले हे अंक मुंबई-ठाणे शहरात प्रदर्शन आयोजित करून मांडले जातात. त्यानंतर हे अंक ग्रामीण भागातील शाळा-वाचनालयांना मोफत दिले जातात.
स्पर्धेकरिता दिवाळी अंकांच्या संपादक-प्रकाशकांनी अंकाच्या २ प्रती रवींद्र मालुसरे, अध्यक्ष-मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, घरकुल सोसायटी, रूम नं. ६१२, सहावा मजला, सेंच्युरी बाजार लेन, भुस्सा इंडस्ट्रियल इस्टेटसमोर, प्रभादेवी, मुंबई – ४०० ०२५ या पत्त्यावर पाठवाव्यात, असे आवाहन संघाचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी रवींद्र मालुसरे (९३२३११७७०४) यांच्याशी संपर्क साधावा.