तब्बल 28 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
अध्येत 500 वर्षांनी साजरी झाली खरी दिवाळी
अयोध्या : तब्बल 28 लाख विश्वविक्रमी दिव्यांनी उजळलेला शरू नदीचा काठ, स्वर्गाचा भास निर्माण करणारे दिव्य वातावरण आणि भाविकांची उसळलेली अलोट गर्दी यामुळे रामनगरी अयोध्या डोळ्यात साठवताना भाविकांच्या मनात “सरयू तिरावरी अयोध्या मनुनिर्मीत नगरी” गीत रुंजी घालत होते. राम मंदिराचा मुस्लिम आक्रमकांकडून झालेल्या विध्वंसानंतर तब्बल 500 वर्षांनी आज, बुधवारी अयोध्येत खरी दीपावली साजरी झाली. अयोध्येत जानेवारी महिन्यात राम मंदिराच्या उद्घाटनानंतर यंदा पहिल्यांदाच दिवाळी साजरी होत आहे. गेल्या वर्षी शरयू नदी काठावर 25 लाख दिवे लावण्यात आले होते. यंदा मागील वर्षीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडत अयोध्येत 28 लाख दिवे प्रज्ज्वलीत करण्यात आले होते.
या दिपोत्सवात चौधरी चरण सिंह घाटावर स्वस्तिकाच्या आकारात मांडलेले 80 हजार दिवे लक्षवेधी ठरले. शरयू घाटांवर 5 ते 6 हजार पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था पूर्ण झाली आहे. या नेत्रदीपक व ऐतिहासिक सोहळ्याचे 40 जंबो एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणही करण्यात आले होते. या दीपोत्सवात म्यानमार, नेपाळ, थायलंड, मलेशिया, कंबोडिया आणि इंडोनेशिया या 6 देशांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच उत्तराखंडमधील राम लीला पथकाचे सादरीकरण झाले. उत्तर प्रदेशच्या पशुसंवर्धन विभागाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 150,000 ‘गौ दीप’ प्रज्वलित केले. एकूण 30 हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी घाट सजवण्याच्या कामात सहभाग घेतला होता.