तासगाव : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर सिंचन घोटाळा प्रकरणी गंभीर आरोप केले असून, यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे झालेल्या सभेत पवारांनी आरोप केला की आर. आर. पाटील यांनी सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर त्यांच्या विरोधात खुली चौकशी करण्यासाठी स्वाक्षरी केली होती. माझ्या विरोधात ७०,००० कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले परंतु त्या काळात संपूर्ण खर्चाची रक्कम ४२,००० कोटी इतकीच होती. मला यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप अजित पवार यांनी केला.
अजित पवारांच्या या वक्तव्यावरून आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या पवारांवर टीका केली. सांगली जिल्ह्यातील ढवळी येथील प्रचारसभेत रोहित पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना माझ्या वडिलांना कोणी मानसिक त्रास दिला हे मला माहीत आहे. आबा (आर. आर. पाटील) त्यांच्या जवळच्या मित्रांच्या खांद्यावर डोके ठेवून अश्रू ढाळायचे, हे मला त्यांच्या मित्रांनी सांगितले आहे. पुढे बोलताना रोहित पाटील यांनी,आम्ही योग्य वेळी याचे उत्तर देऊ, असा इशारा दिला.
अजित पवारांच्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आर. आर. पाटील यांच्यासारखा आदर्श नेता आता हयात नसताना त्यांच्यावर असे आरोप करणे चुकीचे आहे. चौकशीला कोणी घाबरण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.