मुंबई : शिवकालीन मोडी लिपीच्या प्रसारार्थ असलेला मराठी वाचकांनाही खुमासदार मेजवानी देणारा मोडीदर्पण दिवाळी अंक मुंबई येथील पवई हायस्कूलमध्ये दिमाखदार सोहळ्यात प्रकाशित झाला. ज्येष्ठ कवी, व्याख्याते प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. ज्येष्ठ चित्रकार-कवी-लेखक विजयराज बोधनकर, सुप्रसिद्ध उद्योजक मधुकर गोमणे, बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी के. आर. कंदी, लेखक सुरेश हांडे आणि मोडीदर्पणचे संपादक सुभाष लाड हे यावेळी व्यासपीठावर होते. मोडी लिपीला संगणकीय रूपात आणून नव्या पिढीला नव्या स्वरूपात मोडी लिपीची ओळख करून देणारे कोल्हापूरचे नवीन कुमार माळी यांना मोडीलिपी मित्र मंडळातर्फे मोडीरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोडीदर्पणतर्फे आयोजित केलेल्या ग्रामीण कथा स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
आपल्या विनोदी ढंगाने कवितांची पखरण करीत प्रसाद कुलकर्णी यांनी मोडीदर्पणने आपला वेगळा ठसा उमटवल्याबद्दल कौतुक केले. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने त्याचे कौतुक करताना आपण आपल्या पिढीजात मराठीने केलेल्या कामगिरीला तितकेच मोलाचे स्थान आहे, याचे भान आपल्याला जपायला हवे, असे त्यांनी सांगितले. मोडीदर्पणने दिवाळी अंकात कोकणातील बोलीभाषांचा परिचय करून देण्याचे काम केल्याने हा अंक संग्रही ठेवण्यासारखा झाला आहे, असेही ते म्हणाले. संपादक सुभाष लाड यांनी मोडी लिपीच्या प्रसारकार्यासाठी समाजातील मोडी अभ्यासक जसे झटून काम करत आहेत, तसेच या कामी अनेक दातेसुद्धा मोकळ्या मनाने आर्थिक योगदान करत आहेत, याबद्दल समाधान व्यक्त केले. अनेक क्रियाशील कार्यकर्ते जोडले गेल्याने गेली पंधरा वर्षे सातत्याने मोडीदर्पण प्रकाशित होत आहे. याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. याच व्यासपीठावर विजयराज बोधनकर यांच्या हस्ते रत्नागिरीतील ‘कोकण मीडिया’ दिवाळी अंकाचेही प्रकाशन झाले. यावेळी विजयराज बोधनकर, डॉक्टर मंगेश हांदे, के. आर. कंदी, मधुकरजी गोमणे यांनी शुभेच्छा दिल्या. मोडीदर्पणचे सहसंपादक मोडीअभ्यासक सुनील कदम, प्रकाश हर्चेकर, गणेश चव्हाण, प्रमोद पवार, विजय बाराथे, गणेश साळुंखे, प्रमोद मेस्त्री, सुरेश पेडणेकर, तेजस तावडे, योगेश पेडणेकर, अॅड. निकिता लाड, मिलिंद कोटकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.