ठाणे – ठाण्यातील पाचवड गावांमधील आदिवासी मुलांनी दिवाळी एका अनोख्या पद्धतीने साजरी केली. गेली पाच वर्ष दिवाळीच्या सुट्टीमध्ये आकाश कंदील बनवून आणि त्याची विक्री करून या गावांमध्ये दिवाळी साजरी होते. यावर्षी सुद्धा ८०० आकाश कंदील ४० मुला-मुलींनी मिळून बनवले. या विक्रीच्या पैशातून तेथील मुले दिवाळी साजरी करतात. त्यातील काही मुले आई-वडिलांकडे पैसे देऊन घर खर्चाला मदत करतात तर काही मुले स्वतःच्या शालेय शिक्षणाचा खर्च भागवतात.
या उपक्रमाचा मूळ उद्देश आदिवासी मुलांनी दिवाळीच्या सुट्टीमध्ये काही व्यवसायाभिमुख प्रशिक्षण घेऊन नंतरच्या आयुष्यात त्याचा आपण कसा उपयोग करू शकतो हा आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून एडवोकेट रुचिका ताई शिंदे या उपस्थित होत्या, त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी ज्या पद्धतीने रेवा साडीच प्रशिक्षण देऊन महेश्वर मधील साडी व्यवसायाला चालना दिली, त्याच पद्धतीने पाचवड गावातील मुलांनी सुद्धा प्रेरणा घेऊन व्यवसाय वृद्धिंगत करावा असे प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पवन ठाकूर यांनी मुलांचे कौतुक केले. गेले आठ दिवस हा उपक्रम चालू होता यामध्ये प्रियांका पासारे, मीनाली लढे आणि साहिल जाधव यांनी अनुभव कथन केले.या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे अहिल्याबाई होळकर यांची जन्म त्रिशताब्दी वर्ष असल्यामुळे त्यांच्या जीवनावर आधारित चित्र प्रदर्शनी लावण्यात आली होती, ही चित्र प्रदर्शनी तेथील मुला मुलींना नक्कीच प्रेरणादायी होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल शिंदे आणि प्रस्तावना उर्मिलाताई गावित यांनी केली. कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून राम ठाकूर, प्रशांत इंगवले, जयसिंग ठाकूर आणि अर्चना गावडे हे उपस्थित होते.