रत्नागिरी – कलांगण-संगमेश्वर आणि श्री कर्णेश्वर देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरा कला-संगीत महोत्सव येत्या ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. प्राचीन रामक्षेत्रातील ऐतिहासिक प्राचीन वारसा असलेले समृद्ध भारतीय स्थापत्य वैभव असलेल्या कसबा संगमेश्वर येथील श्री कर्णेश्वर मंदिराच्या प्रांगणात हा महोत्सव होणार आहे. पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या सौजन्याने हा महोत्सव होणार आहे.
महोत्सवाचा प्रारंभ शुक्रवार दि. ६ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता होईल. स्व. पं. गोविंदराव पटवर्धन जन्मशताब्दीनिमित्ताने ठाण्याचे आदित्य विद्याधर ओक यांचे संवादिनी एकलवादन यावेळी होईल. त्यांना प्रसाद पाध्ये तबलासाथ करतील. शनिवारी, दि. ७ डिसेंबर रोजी मुंबईतील नृत्यालंकार सोनिया परचुरे आणि सहकाऱ्यांचा नृत्यांजली’ हा एकल कथ्थक नृत्याचा कार्यक्रम होईल. अखेरच्या दिवशी रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी गोव्यातील मुग्धा गावकर आणि प्राची जठार यांची ‘स्वरसखी’ ही गायन मैफल होईल. संपूर्ण कार्यक्रमाची ध्वनिव्यवस्था उदयराज सावंत सांभाळणार आहेत. दररोज रात्री ९ हे कार्यक्रम कसबा-संगमेश्वर येथील श्री कर्णेश्वर मंदिराच्या प्रांगणात होतील. या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.