मुंबई : शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही ना त्या एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी आहे, ना त्या उद्धव ठाकरेंची, ती बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी शिवसेना पक्ष आणि चिन्ह पळवण्यावरुन दोन्ही पक्षाच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. यावेळी या विषयावर भाष्य करतांना दिपक केसरकर म्हणाले. ही प्रॉपर्टी बाळासाहेबांची जरी असली तरी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या लोकांनांच त्यांची प्रॉपर्टी मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ हे बाळासाहेबांच्या विचारांवर चालतात म्हणून लोक त्यांच्याबरोबर राहिले. मशालीपेक्षा त्यांना जास्त मते मिळाली असल्याचे मत मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं. बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले हे महाराष्ट्रातील जनतेला माहित असल्याचे केसरकर म्हणाले. दरम्यान, राज ठाकरे हे मोठे नेते आहेत. ते काय बोलले यावर माझ्यासारख्या छोट्या माणसाने बोलणे योग्य नाही असे केसरकर म्हणाले. सावरकरांचा ज्यावेळी अपमान झाला त्यावेळी बाळासाहेबांनी जोडो मारो आंदोलन सुरु केले होते. ते मंत्री मुंबईत पाऊल नाही टाकू शकले, ही बाळासाहेबांची ताकद होती. सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी काहीही बोलावे आणि आमच्या युवराजांनी त्यांना मिठी मारावी, हे चित्र सुद्धा आमच्या जनतेने पाहिले असं केसरकर म्हणाले.