मुंबई : विधानसभा निवडणूक रणधुमाळी प्रचाराला वेग येतोय तसेच आरोप प्रत्यारोपाला ही वेग येत आहे, अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार शरदचंद्र पवार यांच्यावर महायुती घटक पक्षाचे नेते सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टिप्पणीमुळे राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा समाचार घेतला.. ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे आणि निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
सांगलीमधील जतमध्ये भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारसभेत सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त विधान केले आहे. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या शारीरिक व्यंगावरून केलेल्या टीकेनंतर त्यांच्यावर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. विधानसभा निवडणुक जवळ येत असल्याने आता प्रचारांचा धडाका पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि पक्षातील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच बुधवारी महायुतीमधील घटक पक्षाचे नेते सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले आहे. शरद पवार यांच्या शारीरिक व्यंगावरून सदाभाऊ खोतांनी पवारांवर निशाणा साधला परंतु आता खोत ट्रोल झालेले पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावर हे खपवून घेणार नसल्याचं म्हणत निषेध व्यक्त करत आपली भूमिका मांडली आहे.