मुंबई – भाजपाने उद्धव ठाकरे यांच्याशी युती तोडली आणि अनेक पक्ष फोडून महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढल्याने भाजपाबद्दल अनेक जणांना रोष असतानाच भ्रष्टाचाराची प्रकरणे काढण्यात आघाडीवर असलेले किरीट सोमय्या यांनी मोठा गौप्यस्फोट करीत म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांनीच मला उद्धव ठाकरेंशी संबंधित भ्रष्टाचाराची प्रकरणे शोधून काढण्याचा आदेश दिला होता. सुरुवातीला मी तसे करण्यास नकार दिला. मात्र हा पक्षाचा आदेश आहे असे त्यांनी मला बजावले आणि मला काम करायला लावले. किरीट सोमय्या यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात वातावरण तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. अशात आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी रोज झडत आहेत. भाजपाचे नेते किरिट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सत्ताधाऱ्यांवर आरोप केले होते, त्यांचे घोटाळे बाहेर काढले होते. किरिट सोमय्या यांनी यामागचं कारण आता सांगितलं आहे. विरोधी पक्षातल्या लोकांना ठाकरे सरकारने तुरुंगात धाडलं असतं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.
२०१९ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते होते. त्यांनी अत्यंत आक्रमकपणे विधानसभेत त्यांची कामगिरी करुन आपण किती धडाडीचे नेते आहोत हे दाखवून दिलं होतं. तसंच अनेक घोटाळे बाहेर काढले होते. विधानसभेत देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले होते. तर किरीट सोमय्यांनी विधानसभेच्या बाहेरची खिंड लढवली होती. प्रसंगी हातोडा घेऊनही ते बाहेर पडल्याचं महाराष्ट्राने पाहिलं आहे. अशात हे सगळं का केलं याबाबतची माहिती स्वतः किरीट सोमय्यांनीच दिली आहे.