नाशिक : महायुती सरकारमुळे नाशिक जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलतो आहे. फेक नरेटिव्हला आता जनता भुलणार नाही. त्यांना सारे समजते आहे, असे घाणाघाती भाषण राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनखालील महायुती सरकार हे सर्व घटकांना न्याय देत आहे. त्यामुळे कुठलाही घटक विकासापासून वंचित राहणार नाही. लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपयांची मदत तर होईलच हळूहळू ती वाढत जाईल. महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य जाहीर सभा तपोवन येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी भुजबळ बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, नाशिक जिल्ह्यातील युतीचे सर्व उमेदवार यावेळी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणेद्वारे मंत्री भुजबळ यांनी भाषणाची सुरुवात केली. त्यानंतर ते म्हणाले की, देशात पहिल्यांदाच जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक गावात नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली. त्यामुळे महिलांच्या पायपीट थांबून डोक्यावरील हंडा उतरला आहे. येवल्यात राजापूरसह ४१ गाव पाणी पुरवठा योजना, धुळगावसह १७ गावे पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत असून दोन महिन्यात या योजना पूर्ण होऊन येवला तालुक्यातील प्रत्येक गावाला नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. लाडकी बहिण योजनेद्वारे सध्या दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. मात्र, पुन्हा सत्ता येताच ही रक्कम २१०० रुपये केली जाऊन नंतरही ती वाढतच जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक जिल्ह्याचा चेहरामोहरा महायुती सरकार बदलत असल्याचे सांगताना भुजबळ म्हणाले की, समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्यात असून भिवंडी पर्यंतचा रस्ता पुढील दोन महिन्यात खुला होईल. नाशिक शहरातील सर्व रस्ते कॉंक्रीटचे होत आहे. किकवी धरणाच्या कामाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे नाशिक शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उदभवणारच नाही. आगामी कुंभमेळ्यासाठी अनेक विकास कामे करावी लागणार आहे. याबाबत माझी खात्री आहे की मोदी साहेब नक्कीच आवश्यक तो निधी आपल्याला उपलब्ध करून देतील.
लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्ह विरोधकांकडून पसरवले गेले. संविधान बदलण्याची भाषा वापरली गेली. मात्र, जनतेने सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विराजमान केले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी संविधानासमोर डोके ठेवले आणि ते नतमस्तक झालेले आपण साऱ्यांना पाहिले. आता पुन्हा राहुल गांधी यांनी संविधान दाखविले. मात्र, आता जनता फेक नरेटिव्हला भुलणार नाही. त्यांना सारे कळते आहे, असा टोलाही भुजबळ यांनी लगावला. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यात जी महत्वाची विकासकामे आहे ती पूर्ण करून नाशिकचा चेहरा मोहरा बदलू, अशी ग्वाही भुजबळ यांनी दिली.