उत्तर कोरिया – उत्तर कोरियाने यापूर्वी दोन वेळा हायपरसॉनिक क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्या. २०२१मधील चाचणीदरम्यान ग्लायडरच्या आकाराचे स्फोटकाग्र होते. तर २०२२मध्ये नेहमीच्या परिचयातले, कोनच्या आकाराचे स्फोटकाग्र आजमावले गेले. अर्थात ही माहिती दक्षिण कोरियाच्या लष्करी हेरांनी टिपली. दुसऱ्या प्रकारातील क्षेपणास्त्र मॅनुवरेबल रिएंट्री (MaRV) प्रकारातील आहे. म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जाऊन पुन्हा वातावरणात प्रवेश करत असतानाच दिशा बदलण्याची क्षमता या प्रकारच्या क्षेपणास्त्रामध्ये असते. याचा एक मोठा फायदा म्हणजे स्थायी आणि अस्थायी अशा दोन्ही लक्ष्यांचा वेध घेणे शक्य होते. शिवाय क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेस चकवा देण्याची क्षमता या क्षेपणास्त्राला अधिक धोकादायक बनवते. या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून जगात कोठेही ‘शत्रू’वर हल्ला करण्याची क्षमता उत्तर कोरियाने हस्तगत केल्याचे तेथील सरकारी माध्यमांनी म्हटले आहे.
ध्वनीच्या वेगापेक्षा पाचपट वेगाने म्हणजे साधारण ताशी ६२०० किलोमीटर वेगाने (ताशी ३८५० मैल) आणि बहुतेकदा कमी उंचीवरून स्फोटकाग्रे (वॉरहेड्स) वाहून नेण्याची या क्षेपणास्त्रांची क्षमता असते. या क्षेपणास्त्रांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांची लवचीकता. म्हणजे क्षेपकवक्र (ट्रॅजेक्टरी) बदलण्याची या क्षेपणास्त्रांची क्षमता असते. हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांपेक्षा काही वेळा अधिक वेगवान आंतरखंडीय क्षेपणास्त्रेही विकसित झाली आहेत. पण त्यांच्यात हायपरसॉनिक क्षेपणास्त्राइतका अचूक लक्ष्यभेद करण्याची शक्यता नसते.