मुंबई – जळगाव येथे महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी हजेरी लावली. यावेळी बोलतांना शहा म्हणाले. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात मुस्लिमांना 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. मूळात आरक्षणाची मर्यादा ही 50 टक्क्यांपेक्षा जास्त होऊ शकत नाही. त्यामुळे ओबीसी आणि दलितांचे आरक्षण कमी करून ते मुस्लिमांना देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी केला. जळगाव येथे महायुती उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.शाह पुढे म्हणाले, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांनी त्यांची सत्ता असताना महाराष्ट्राला फक्त 1 लाख 91 हजार कोटी रुपये एवढाच निधी दिला. मात्र मोदी सरकारच्या काळात 10 लाख 90 हजार कोटी दिले आहेत.
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा महाराष्ट्र प्रगतीच्या वाटेवर होता. महाराष्ट्राला नंबर एकवर नेण्याचा आमचा प्रयत्न असेल, म्हणून महायुतीला समर्थन द्या. आमच्या सर्व उमेदवारांना मोठ्या बहुमताने निवडून द्या आणि मोदींचे हात मजबूत करा, देशाला सुरक्षित करा, मुस्लिम आरक्षणाला अटकाव करा, असे आवाहनही त्यांनी केले. औरंगाबादच्या नामांतराला देखील मविआने विरोध केला. कलम 370 हटवण्यास देखील विरोध केला होता. वक्फ बोर्ड कायद्यातील सुधारणेला देखील विरोध केला. मात्र वक्फ बोर्ड कायद्यात बदल करायचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निश्चय केला आहे. सत्तेच्या भुकेने महाविकास आघाडी अंध झाली आहे. पवारांसारख्या नेत्यांनी राम मंदिर अडकवून ठेवलं. मोदींनी पाच वर्षांत राम मंदिराचे काम सुरु केले. यंदा 550 वर्षानंतर रामलल्लाने दिवाळी अयोध्येत साजरी केली.
काँग्रेस काळापेक्षा मोदी सरकारच्या काळात राज्याच्या दहा लाख करोड रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. या अगोदर एवढी मदत झाली नव्हती. विविध सरकारी विकास योजना, गरिबांसाठी योजना आणल्या. लाडकी बहीण योजना महिलांसाठी फायदेशीर असताना हे त्यालाही विरोध करत आहेत. मात्र पुन्हा महायुती सरकार आल्यावर 2100 रुपये रुपये देण्यात येतील. नाशिक-पुणे रेल्वेला आम्ही मंजुरी दिली आहे. 67 लाख गरिबांची बँक खाती उघडली आहे. 12.35 लाख गरिबांच्या घरी एलपीजी सिलेंडर पोहोचवले. एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यापासून महाराष्ट्रात उद्योग येत आहेत, मविआ सत्तेत आली तर ते वक्फ बोर्डाच्या बाजूने निर्णय घेतील, असेही शाह म्हणाले.