• विधानसभा निवडणुकांसाठीच्या भाजपाच्या संकल्पपत्राचे प्रकाशन
• हे संकल्पपत्र हे राज्याच्या विकासाचे दृष्टीपत्र ठरेल : सुधीर मुनगंटीवार
• भाजपाचे संकल्पपत्र हे जनतेचे संकल्प साकार करणारे : देवेंद्र फडणवीस
मुंबई : भाजपाचे संकल्पपत्र हे महाराष्ट्राला देशात अव्वल स्थानी असेल , तसेच या संकल्पपत्राच्या आधारे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर्सचे उद्दीष्ट पार करेल असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. आगामी निवडणुकांसाठीच्या महाराष्ट्र भाजपाच्या संकल्पपत्राचे प्रकाशन काल मुंबईत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाहा यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते पत्रकारांना संबोधित करीत होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की हे संकल्पपत्र जनतेचे संकल्प साकार करणारे ठरेल. तर यावेळी बोलतांना भाजपाच्या जाहिरनामा समितीचे प्रमुख मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की जनतेच्या सहभागातून तयार करण्यात आलेले हे संकल्पपत्र राज्याच्या विकासाचे दृष्टीपत्र ठरणार आहे.
रविवारी मुंबईत एका पत्रकार परिषदेत महाराष्ट्र भाजपाच्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या संकल्पपत्राचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, निवडणुक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, जाहिरनामा समितीचे संयोजक डॉ. विनय सहस्रबुद्धे, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अमित शाहा पुढे म्हणाले की भारतीय जनता पार्टीने आजवर दिलेली आश्वासने नेहमीच पूर्ण केली आहेत. जम्मू – काश्मीर चे 370 वे कलम रद्द करणे, तिहेरी तलाक रद्द करणे, नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती (सीएए), राम मंदिर उभारणी अशी भाजपाने पूर्ण केलेल्या अनेक आश्वासनांची उदाहरणे अमित शाहा यांनी यावेळी दिली. 2014 मध्ये महाराष्ट्रात सत्तेवर आल्यानंतर भाजपा महायुती सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारे अनेक निर्णय घेतले, असेही ते म्हणले. भारतीय जनता पार्टीने समाजाच्या सर्व घटकांचा विचार करून तयार केलेले हे संकल्प पत्र हे राज्याच्या जनतेचे आकांक्षा पत्र आहे, असेही शाह यांनी यावेळी सांगितले. यावेळी शाह यांनी महायुती सरकारच्या काळात पूर्ण झालेल्या निळवंडे, गोसीखुर्द, टेंभू या सिंचन योजना, कोस्टल रोड, अटल सेतू सारखे रस्ते, पूल, नार पार सारखे नदीजोड प्रकल्प अशा अनेक योजनांचा उल्लेख केला. आजवर राज्यातील कॉंग्रेस आणि शरद पवार यांच्या राजकारणाने शेतकऱ्यांचा आणि गरीबांचा नेहमी घात केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भाच्या सिंचनाच्या प्रश्नांकडे, रस्ते वगैरे विकासाच्या योजनांकडे नेहमी दुर्लक्ष केले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या व इतर प्रश्नांवर सर्वप्रथम भाजपा सरकारने उपाय केले असेही अमित शाहा म्हणाले. संविधानाची खोटी लाल प्रत हातात घेऊन मतदारांची फसवणूक करणाऱ्या राहूल गांधी यांच्या कॉंग्रेस आणि माविआला लोकांनी साथ देऊ नये, असे आवाहनही अमित शाहा यांनी यावेळी केले.
अमित शाहा पुढे म्हणाले की अंतर्विरोधाने भरलेल्या महाविकास आघाडीने सत्तेसाठी तुष्टीकरणाची विचारधारा स्वीकारली आहे. तेलंगणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक या राज्यांत निवडणूक काळात दिलेली आश्वासने काँग्रेस सरकारला पूर्ण करण्यात अपयश आले आहे. कर्नाटकमध्ये अनेक गावेच्या गावे ‘वक्फ’ ची मालमत्ता म्हणून घोषित झाली आहेत, सामान्य माणसाची मालमत्ता वक्फ च्या घशात जात आहे, असे सांगून अमित शाहा पुढे म्हणाले की हे रोखण्यासाठीच मोदी सरकारने वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक आणले आहे. महाराष्ट्रात धार्मिक आधारावर महायुतीच्या विरोधात मतदान करण्याचे फतवे काढले जात आहेत, हे फतवे आपल्याला मान्य आहेत का, हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट करावे असेही अमित शाहा म्हणाले.
हे संकल्पपत्र हे राज्याच्या विकासाचे दृष्टीपत्र ठरेल : सुधीर मुनगंटीवार
यावेळी प्रस्ताविक करतांना जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की हे संकल्पपत्र हे राज्याच्या विकासाचे दृष्टीपत्र ठरेल, असा आमचा विश्वास आहे. ते पुढे म्हणाले की हे संकल्प पत्र निर्माण करतांना जाहिरनामा समितीच्या ३० सदस्यांच्या नेतृत्वात १८ उपसमित्यांमधून एकूण १९२ कार्यकर्त्यांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तर या संकल्पपत्रासाठी जनतेकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यासाठी मतदारांना पंचवीस हजार पत्रे पाठविण्यात आले होते. हजारो ईमेल पाठविण्यात आले होते. व्हॉट्सअप वरूनही आवाहन करण्यात आले होते. त्यातूनच व्यापक जनसहभागाने, जनतेकडून आलेल्या हजारो सूचनांचा विचार करून आणि १८ विषयवार उपसमित्यांच्या माध्यमातून हे “संकल्पपत्र” निर्माण झाले आहे. त्यामुळे हे जनतेचे संकल्पपत्र आहे. या संकल्पपत्रासाठी 877 गावांतून ई मेल, पत्रे, व्हॉट्सअप अशा माध्यमातून 8 हजार 935 सूचना प्राप्त झाल्या. त्यात समाजातील जवळपास सर्व घटकांचा आणि सर्व वयोगटांचा समावेश होता, अशी माहितीही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. महायुतीचे सरकार पुन्हा निवडून आल्यावर संकल्प पत्रातील प्रत्येक मुद्द्यांच्या अंलबजावणीसाठी विषयवार समित्या नेमल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र हे विश्वगौरव पंतप्रधान मा. नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेनुसार क्रमांक एकचे विकसित व लोककल्याणकारी राज्य व्हावे हे उद्दिष्ट साध्य करणारी वाटचाल या संकल्पपत्रामुळे वेगवान होईल असे ते म्हणाले.
भाजपाचे संकल्पपत्र हे जनतेचे संकल्प साकार करणारे : देवेंद्र फडणवीस
भाजपाचे हे संकल्पपत्र हे जनतेचे संकल्प साकार करणारे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संकल्प पत्रातील प्रमुख मुद्द्यांचा आढावा घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, हे संकल्पपत्र विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र तयार करण्याचा रोडमॅप आहे. 2014 मध्ये आम्ही जी आश्वासने दिली होती त्या पैकी किती पूर्ण झाली याचा अहवाल 2019 मध्ये आम्ही सादर केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्याचे काम या संकल्प पत्रातून होणार आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी सूत्रसंचालन करतांना जाहीरनामा समितीचे संयोजक डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी सांगितले की हे संकल्पपत्र ५६ पानांचे असून १४ विभागांमध्ये विभागले आहे. समाजातील सर्व घटकांना स्पर्ष करणारे आणि राज्यव्यवहारातील सर्व विषयांवर दिशादर्शन करणारे असे हे सर्वंकष संकल्पपत्र ठरेल असे ते म्हणाले.
सुधीर मुनगंटीवार यांचे उत्कृष्ट कार्य : मान्यवरांकडून कौतुक
जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील जाहीर नामा समितीनेही हे संकल्पपत्र तयार करतांना अतिशय उत्कृष्ट कार्य केले आहे, असे गौरवोद्गार यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. सुधीर मुनगंटीवार यांच्या टीमनेही उत्तम काम केले आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.