ठाणे : ठाण्यातील वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनने ठाणे शहर विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार संजय केळकर यांना निवडणुकीत आपला जाहीर पाठींबा दिला आहे. केळकर हे सतत आमच्यासाठी लढत असतात, विधानसभेत आवाज उठवित असतात. त्यामुळेच आम्ही देखील त्यांच्या सोबत आहोत, असा निर्धार वृत्तपत्र विक्रेत्यांनी केला आहे.
या संदर्भातील पत्र असोसिएनशचे अध्यक्ष दत्ता घाडगे यांनी भाजपचे उमेदवार संजय केळकर यांना दिले आहे. आमच्या वृत्तपत्र विक्रेत्यांना आपण अनेक वेळा सहकार्य केले आहे. कोरोना काळात किराणा माल वाटप असेल, गरजू विक्रेत्यांच्या मुलांना शैक्षणिक मदत असेल. सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेची अनेक वषार्पासून ची मागणी होती की वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ व्हावे, याबाबत आपण अनेक वेळा विधानसभेत आवाज उठवला आणि ती मागणी महायुती सरकारने मान्य केली. हे फक्त आपल्यामुळे झालेले आहे. म्हणून ठाणेशहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये केळकर यांना पाठिंबा देण्याच जाहीर करत असल्याचे त्यांनी एका पत्राद्वारे केले आहे. तसेच आमचे वृत्तपत्र विक्रेते घरोघरी जाऊन आपापल्या पद्धतीने आपला प्रचार करून निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.