अजित पवार यांच्याशिवाय सरकार महाराष्ट्रात बनणार नाही…..!

0

नवाब मलिक यांचा दावा

मुंबई – अनंत नलावडे

राजकारणात कुणीही परममित्र किंवा परमशत्रू असत नाही.वेळेनुसार सर्व बदलत असतात.कारण २०१९ मध्ये अशाप्रकारे सरकार बनवले जाईल असे कुणाला वाटले होते का.मात्र वेगळे घडले त्यामुळे २३ नोव्हेंबरला निकाल आला की,अजित पवार यांच्याशिवाय कोणतेही सरकार महाराष्ट्रात बनणार नाही असा स्पष्ट दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी गुरूवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला.

आमचा नेता हा किंगमेकरच असून राजकारणात सर्व नेत्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असते.परंतु आज आमची इतकी ताकद नाही की,आम्ही मुख्यमंत्री होण्यासाठी दावा करु शकतो.मात्र आम्हीच किंगमेकर बनणार आणि आम्हीच ठरवणार सरकार कसे बनवायचे आणि कुणाचे बनवायचे असेही मलिक यांनी यावेळी स्पष्ट केले. अजितदादाने इच्छा व्यक्त केली हे खरेच आहे.राजकारणात मधु कवडा एक आमदार मुख्यमंत्री बनू शकतो तर अजित पवार हे महाराष्ट्रातील एक मोठी ताकद असून निवडणूक निकालानंतर बघू, मात्र आमच्याशिवाय कोणच सरकार बनवू शकत नाही याचा पुनरुच्चारही मलिक यांनी व्यक्त केले.

सध्या महाविकास आघाडीच्या वतीने सतत राष्ट्रवादी काँग्रेसवर अंगुलीनिर्देश केले जात आहे की, हे भाजपसोबत आहे.परंतु आमचे हे ‘पॉलिटिकल अडजेस्टमेंट’ आहे हे वारंवार अजित पवारांनी स्पष्ट केले असून आम्ही आमची विचारधारा सोडू शकत नाही. कारण आम्हाला धर्मनिरपेक्षता, लोकतांत्रिक व्यवस्था हवी आहे.आम्ही शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारधारेसोबत जोडलेले आहोत.परंतु जे लोक भाजपसोबत असल्याचा कांगावा करत आहेत त्यांना माझा सवाल आहे की, महाराष्ट्रात मविआचे घटक पक्ष असलेले उध्दव ठाकरे कालपर्यंत भाजपसोबत होते की नाही… पवारसाहेब १९७८ पासून १९८७ पर्यंत पुलोदचा फार्मुला मुख्यमंत्री बनण्यापासून ते निवडणूक लढवण्यापर्यंत भाजपसोबत पॉलिटिकल अडजेस्टमेंट केली होती की नाही…ममता बॅनर्जी भाजपसोबत होत्या की नाही…देशात जनता दलाचे सरकार होते आणि राजीव गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवली गेली त्यावेळी समाजवादी पक्षाचे सर्व नेते जनता दलात होते त्यावेळी भाजपसोबत राहून उत्तरप्रदेशमध्ये निवडणूक लढवली गेली की नाही. मुलायमसिंग यादव यांनी भाजपचे समर्थन मिळवून मुख्यमंत्री बनले की नाही.मायावती भाजपसोबत होत्या की नाही.लालूप्रसाद यादव यांचे समर्थन बिहारमध्ये भाजपने केले होते की नाही.त्यामुळे मला वाटते वेळेनुसार पॉलिटिकल अडजेस्टमेंट राजकीय पक्ष करत असतात.राष्ट्रवादी काँग्रेसनेसुध्दा पॉलिटिकल अडजेस्टमेंट केले आहे. परंतु वैचारिक विचारधारा आहे ती कदापि सोडणार नाही.सरकार नक्की येईल आम्ही किंगमेकर ठरणार आहोत. मात्र आमच्या अटीवर येणारे सरकार बनेल असा विश्वास व्यक्त करतानाच आम्ही भाजपच्या अजेंड्यावर डोळे झाकून राहणारे लोक नाही असेही मलिक यांनी पक्षाची भूमिका मांडताना स्पष्ट केले.

ज्या लोकांना वाटत होते नवाब मलिक हे राजकारणातून संपले पाहिजे हा भ्रम होता, त्यांचा लवकरच यापाठीमागचा चेहरा समोर तर येईलच,पण ज्या लोकांचे माझ्यावर खूप प्रेम आहे असे लोक माझा जामीन रद्द करुन पुन्हा एकदा मला जेलमध्ये टाकण्याच्या प्रयत्नात आहेत असाही थेट हल्लाबोल मलिक यांनी यावेळी केला.

सुप्रीम कोर्टाने मला जामीन दिला असून शेवटचा आदेश दिला आहे त्यात जोपर्यंत हायकोर्ट माझ्या जामीनावर निर्णय घेत नाही तोपर्यंत हा जामीन कायम राहणार आहे.त्यात माझ्यावर मिडियासोबत बोलण्याची बंदी होती त्याबाबत कोर्टाकडून संबंधित केससंदर्भात मिडियासोबत बोलणार नाही अशी परवानगी घेतली आहे.राजकीय विषयावर किंवा इतर कोणत्याही विषयावर बोलायला मला बंदी नाही.ज्याप्रकारे याचिका दाखल करण्यात आली ती याचिका म्हणजे मला पुन्हा थांबवण्याचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाला मी घाबरणार नाही. याच्या पाठीमागे कोण आहे याचा चेहरा आज ना उद्या समोर येणारच आहे.मात्र महाराष्ट्रातील आणि मुंबईतील जनता हे सर्व जाणते की,कोणत्या लोकांना माझ्यामुळे राजकारणात अडचणी निर्माण झाल्या आहेत त्यांची नावे लवकरच पुढे येतील.परंतु मी जेलमध्ये जायला घाबरत नाही.माझ्या बोलण्यावर मी कायम असून सुप्रीम कोर्टाने जामीन दिल्यावर ज्या अटी घातल्या होत्या त्या अटींचा मी कधीच उल्लंघन करणार नाही असे स्पष्ट करतानाच,मी या सगळ्या गोष्टींचे पालन करत असल्याचे स्पष्टीकरणही मलिक यांनी दिले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech