मुंबई – राज्यात यंदा पाच टप्प्यात होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानात महिला शक्ती निर्णायक ठरणार आहे. मागील वर्षात राज्यात मतदारांची संख्या लक्षणीय वाढली असून त्यात महिला मतदारांची संख्या लक्षणीय म्हणजे 4 कोटी 44 लाख 16 हजार 814 इतकी आहे. मागील चार निवडणुकांच्या तुलनेत यावर्षी 1 हजार पुरुषांमागे 923 महिला मतदार अशी लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यात लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्त्वाचा वाटा असेल. कारण 2004, 2009, 2014 आणि 2019 च्या तुलनेपेक्षा 2024 मध्ये महिला मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
राज्यात 2004 मध्ये पुरुष आणि महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यावर्षी एकूण 3 कोटी 42 लाख 63 हजार 317 मतदारांची नोंदणी झाली होती. 2009 आणि 2014 या दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा कमी होती. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार 1 हजार पुरुषांमागे 925 महिला असे प्रमाण होते. सन 2014 मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण 1 हजार पुरुषांमागे 889 महिला इतके होते. सन 2019 मध्ये 1 हजार पुरुषांमागे 911 महिला असे प्रमाण होते. 2024 मध्ये 1 हजार पुरुषांमागे 923 महिला अशी लक्षणीय सुधारणा आता झाली आहे.