*अडीच वर्षात प्रकल्पांना स्थगिती देण्याचे काम केलं
*मुंबईत महायुतीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उबाठावर जोरदार प्रहार
मुंबई : महाराष्ट्रात आजवर जितके काम झाले नाही ते काम केंद्र सरकारच्या भक्कम पाठिंब्याने गेल्या दोन वर्षात केले. अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या बंद सम्राटाने केवळ स्थगिती देण्याचे काम केले आणि महाराष्ट्राला १० वर्ष मागे ठेवले, असा जोरदार प्रहार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उबाठावर केला. महाराष्ट्रविरोधी सरकार उलथवून आम्ही मुंबई आणि महाराष्ट्राला ग्रहणातून सोडवले असे मुख्यमंत्रक्षी म्हणाले. शिवतीर्थावर आयोजित महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महायुतीचे नेते आणि मुंबईतील सर्व उमेदवार उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले २००४ ते २०१४ या दहा वर्षात केंद्रातील काँग्रेस सरकारने महाराष्ट्राला केवळ २ लाख कोटींचा निधी दिला होता. मात्र २०१४ ते २०२४ या मोदीजींच्या १० वर्षांच्या काळात केंद्र सरकारने महाराष्ट्राला तब्बल १० लाख कोटी दिले. दुप्पट नाही पाच पट निधी केंद्र सरकारने दिला त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखतय. बंद सम्राट आजही क्लस्टर डेव्हलपमेंट बंद करु, रिफायनरी बंद करु, धारावी पुनर्विकास बंद करु, अशी भाषा करत आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी उबाठावर केली. आता या बंद स्रमाटांना कायमचे घरात बंद करण्याचा निर्धार महाराष्ट्रातील जनतेने केलाय असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, ‘एफडीआय’मध्ये महाराष्ट्र नंबर एकवर आहे. परकीय गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्राला पहिली पंसती देत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेने महाविकास आघाडीचा गेम चेंज केलाय. लाडकी बहिण योजनेने महाविकास आघाडी कोमात गेल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. महायुतीच्या योजना चोरून महाविकास आघाडीने थापासूत्री तयार केली. कॉपी करणारे कधी पास होत नाही, असा घणाघात त्यांनी यावेळी केला
या शिवतीर्थावरून बाळासाहेब ठाकरे विचारांचे सोने वाटायचे, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवतीर्थावर विचारांचे सोने वाटायला आले आहेत. त्यामुळे आजचा दिवस दसऱ्याचा आहे आणि २३ तारखेला दिवाळी साजरी करायची आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. जनतेच्या गळ्याभोवती आवळलेला फास आपल्याला सोडवायचा आहे. येत्या २० तारखेला धनुष्यबाण,कमळ आणि घड्याळ या चिन्हांवर शिक्का मारुन महायुतीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी मतदारांना केले.