सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही

0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नांदेडमधील प्रचार सभेत ग्वाही

महायुतीचे सरकार येताच नांदेडमध्ये एमआयडीसी मंजूर करणार


नांदेड :  महायुती सरकारने दोन वर्षांत शेतकऱ्यांना १५००० कोटींची मदत केली. आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्धार आम्ही केलाय. सोयबीन खरेदी केंद्र वाढवणार आहोत. किमान आधारभूत किंमतीतील तफावत भरुन काढण्यासाठी सरकारकडून भावांतर योजना लागू केली जाईल, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेडमधील प्रचारसभेत दिली.

भोकर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार श्रीजया चव्हाण आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील महायुतीचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रचार सभा घेतली. या सभेत बोलताना ते म्हणाले की, खासदार अशोक चव्हाण हे आता भाजपमध्ये आहेत. ते या राज्याचे माजी मुख्यमंत्री असल्याने त्यांना अनुभव आहे. यातून नांदेड जिल्ह्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. आपले सरकार वेदना, संवेदना आणि गरिबीची जाण असणारे सरकार आहे.

अडीच वर्षात घरात बसून फेसबुकने लाईव्ह करुन सरकार चालवले. सगळे बडे प्रकल्प बंद केले. कामात स्पीडब्रेकर घालून जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटरग्रीड, मेट्रो असे अनेक प्रकल्प बंद होते. मात्र महाराष्ट्रविरोधी सरकार आम्ही उलथवून टाकले, स्पीडब्रेकर उखडून टाकले आणि महायुतीचे सरकार आणले. एकीकडे विकास कामे आणि दुसरीकडे कल्याणकारी योजनांमधून राज्याला प्रगतीपथावर आणले, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ते पुढे म्हणाले २००४ ते २०१४ या दहा वर्षात केंद्रातील काँग्रेस सरकारने महाराष्ट्राला केवळ २ लाख कोटींचा निधी दिला होता. मात्र २०१४ ते २०२४ या मोदीजींच्या १० वर्षांच्या काळात केंद्र सरकारने महाराष्ट्राला तब्बल १० लाख कोटी दिले. दुप्पट नाही पाच पट निधी केंद्र सरकारने दिला, असे ते म्हणाले.

नांदेड उत्तर विधानसभेतील महायुतीचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री म्हणाले की, मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. मुंबई, ठाण्यानंतर बाळासाहेबांनी मराठवाड्यावर प्रेम केले. शिवसेना आणि मराठवाड्याचे वेगळे नाते आहे. इथले अनेक कार्यकर्ते, नेत बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झाले. महाविकास आघाडीच्या काळात कल्याणकर यांना एक रुपया निधी मिळाला नव्हता, मात्र महायुतीच्या काळात दोन वर्षात कल्याणकर यांनी २५०० कोटींचा विकास निधी आणला. यापुढेही उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी कल्याणकर यांना निधी कमी पडू देणार नाही, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. नांदेड उत्तर मतदार संघात ७० हजार लाडक्या बहिणींना पाच महिन्यांचे पैसे दिले. महायुतीचे सरकार आल्यानंतर इथ एमआयडीसी मंजूर करु, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी

ते पुढे म्हणाले की, काँग्रेस, उबाठा आणि तुतारीचे लोक या योजनेच्या विरोधात केले आणि कोर्टात गेले मात्र कोर्टाने फटकारले, असे मुख्यमंत्री म्हणाले. या योजनेत महिलांना १५०० रुपयांवर ठेवणार नाही. त्यांना लखपती करायचे आहे. कोणीही आले तरी लाडकी बहिण योजना बंद करणार नाही, असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, राजस्थानमध्ये निवडणुकीत काँग्रसने खोटी आश्वासने देऊन सत्तेत आले आणि जनतेची फसवणूक केली, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. डॉ. बाबासाहेबांना दोनवेळा काँग्रेसने हरवले. काँग्रेस जळके घर आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. अशोक चव्हाण यांनी ते ऐकले आणि ते महायुतीत आल्याने या जिल्ह्यात महायुतीची ताकद वाढली.

लाडके भाऊ, ज्येष्ठ नागरिक, शेतकऱ्यांसाठी महायुतीच्या वचननाम्यात १० आश्वासने दिली आहेत. यात महायुती सरकारने लाडक्या बहिणीला २१०० रुपये देण्याचा निर्णय घेतलाय, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि वर्षाला १५००० रुपये, वृद्धांचे पेन्शन २१०० रुपयांपर्यंत वाढवणार, प्रत्येकाला अन्न आणि निवारा देणार, २५ लाख रोजगार आणि १० लाख तरुणांना १० हजार रुपयांना दरमहा प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. महायुतीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी मतदारांना केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech