मुंबई – राज्यासह देशभरातील हवामानात मोठे बदल होत असल्याचे चित्र आहे. एकीकडे राज्यात तापमानाने नवा उच्चांक गाठला असताना आगामी काही दिवसात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. आजघडीला विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यात उष्णतेच्या पा-याने ४० अंश सेल्सिअसचा आकडा पार केला. आज विदर्भात सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्ह्यात ४२.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्याखालोखाल यवतमाळमध्ये ४२ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पुढील ३ दिवस विदर्भातील बहुतांश भागात ४० ते ५० किमी प्रतितास सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह गारपीट आणि अवकाळी पावसाचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे.
विदर्भात एकीकडे उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असताना दुसरीकडे काही भागात पावसाची रिमझिम पाहायला मिळत आहे. पुढील ४८ तासांत राज्यासह देशाच्या विविध भागात पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. यामध्ये विदर्भात उद्या ७ एप्रिल रोजी चंद्रपूर आणि गडचिरोली येथे विजांच्या कडकडाटासह ३०-४० किमी प्रतितास सोसाट्याचा वारा, गारपीट आणि पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाजही नागपूर हवामान विभागाने व्यक्त केला तर नागपूर, यवतमाळ, गोंदिया, अकोला या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह ३०-४० किमी प्रतितास सोसाट्याचा वारा अर्थात वादळीवारा आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे.