काँग्रेसने नेहमीच बाबासाहेबांचा अपमान केला – किरेन रिजीजू

0

नागपूर : काँग्रेस व महाविकासआघाडीचे नेते संविधान हाती घेऊन प्रचार करत आहेत व भाजपवर आरोप करत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच पुढाकारामुळे 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा करणे सुरू झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना हरविण्यासाठी काँग्रेसनेच षडयंत्र केले होते. काँग्रेसने नेहमीच बाबासाहेबांचा अपमान केला. मात्र मतांच्या राजकारणासाठी आता काँग्रेस संविधानप्रेमी असल्याचे नाटक करत आहेत. काँग्रेस नेत्यांनीच नेहमी आरक्षणाला विरोध केला आहे, असा दावा किरेन रिजीजू यांनी केला.

निवडणूक काळात काँग्रेस नेते राहुल गांधी दलित आदिवासींचे नाव घेऊन वेगवेगळे पब्लिसिटी स्टंट करतात. प्रत्यक्षात त्यांना दलित किंवा आदिवासी समाजाची फारशी माहितीच नाही. अजूनही राहुल गांधी अपरिपक्व असल्याची टीका केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी आज, शनिवारी नागपुरात आयोजित पत्रकारपरिषदेत केली.

संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या व्हिजननुसार संविधान तयार करण्याच्या प्रक्रियेवर एक ग्रंथ केंद्र सरकार काढणार आहे. त्यात काँग्रेसने केलेल्या विरोधांचे रेकॉर्डदेखील असतील व जनतेसमोर यातून सत्य आणण्यात येईल, असे रिजीजू यांनी सांगितले. संसदेतील घसरलेल्या दर्जाबद्दल रिजीजू म्हणाले की, पूर्वीच्या काळी काँग्रेसचे नेते संसदेत अभ्यासपूर्ण आणि सखोल भाषणे आणि चर्चा करायचे. परंतु, राहुल गांधी संसदेत आल्यापासून भाषणांचा व चर्चांचा दर्जा घसरला आहे. त्यांचा स्वत:चा काहीच अभ्यास नसतो. कुणीतरी लिहून दिलेले भाषण ते वाचतात. काँग्रेसमधील जे अभ्यासू खासदार आहेत, त्यांना भीतीपोटी हवे तसे भाषण करता येत नाही, असा दावा रिजीजू यांनी केला.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात वक्फ सुधारणा विधेयक मांडण्यात येणार आहे. याबाबत विविध पातळ्यांवर मुस्लिम संघटना, महिला संघटनांशी चर्चा सुरू आहे. आतापर्यंत 80 टक्के मुस्लिमांनी वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा दर्शविला आहे. वक्फच्या नावाखाली कोट्यवधींच्या जमिनी लॅंड माफियांनीच गिळंकृत केल्या आहेत. त्याचा गरीबांना कुठलाही फायदा झालेला नाही. या विधेयकाला मंजूरी मिळाल्यानंतर या जमिनींचा मुस्लिम समाजातील मुले, तरुण, महिला यांच्या विकासासाठीच वापरता येईल असे रिजीजू यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech