न्यूयॉर्क- अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर आणि आजूबाजूचा परिसर काल भूकंपाच्या तब्बल ११ धक्क्यांनी हादरला. या भूकंपाची तीव्रता ४.८ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचे धक्के पूर्व किनारपट्टीवरील इमारतींनाही जाणवले. त्यानंतर स्थानिक वेळेनुसार सकाळी ५.५९ वाजता न्यूजर्सी येथे ४ रिश्टर स्केल तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला. युरोपीयन मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटरच्या माहितीनुसार हा भूकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भात ९ किलोमीटर खोलीवर होता.
न्यूजर्सी झालेल्या भूकंपामुळे जवळच्या राज्यांतील रहिवाशांना आणि न्यूयॉर्क शहरातील रहिवाशांना हादरे बसले. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, गेल्या पाच दशकात या भागात नोंदलेला तिसरा सर्वात मोठा भूकंप होता आणि २४० वर्षांहून अधिक काळातील न्यूजर्सीमधील सर्वात मोठा भूकंप होता. काल सकाळी १०.२३ वाजताच्या सुमारास व्हाइटहाऊस स्टेशन, न्यूजर्सीच्या उत्तरेला ५ मैलांवर भूकंपाची नोंद झाली. या भूकंपाचा केंद्रबिंदू न्यूयॉर्क शहरापासून सुमारे ४५ मैलांवर होता.