नागपूर : सावनेर येथे यावेळी परिवर्तनाचा संकल्प करा आणि सावनेरच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीला साथ द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले. इतकी वर्षे विरोधी आमदार सुनील केदार यांच्यामुळे येथे हलाखी होती. आता निर्णय घेण्यात चुकलात तर पस्तावण्याशिवाय हाती काही येणार नाही. आधी येथे विकासाचे नाही तर दादागीरीचे राजकारण होत होते. सावनेर- नागपूर येथे भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. आशीष देशमुख यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी प्रा. जोगेंद्र कवाडे, अशोक मानकर, डॉ. राजीव पोद्दार, नाना मोहोळ, ताराचंद बावरिया आदी उपस्थित होते. यावेळी श्री. फडणवीस म्हणाले की, नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात विविध विकासकामांमुळे नागपूरचा चेहरामोहरा बदलत असताना विकासाची गंगा येथे रोखण्याचे काम करणा-यांना रोखणे आवश्यक आहे.
हजारो शेतकऱ्यांची स्वप्ने धुळीस मिळवत, कृषी आधारित अर्थव्यवस्था उध्वस्त करत डीसीसी बँकेत घोटाळा करत गरीबांचे पैसे गिळंकृत करणा-या केदार यांना पाच वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. ते सध्या जामिनावर आहेत, पुढची सहा वर्षे निवडणूक लढवू शकत नाहीत. त्यामुळे येथे रबरस्टॅम्प असलेला लोकप्रतिनिधी नको तर सावनेर येथे विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी काम करणारा लोकप्रतिनिधी हवा आहे. फेरो अलॉइड क्लस्टर ची पूर्ण तयारी झाली आहे, फक्त संधी द्या आम्ही देशात सर्वात कमी दरात वीज देऊन येथे क्लस्टर उभारू. क्लस्टरच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल येथील लोकांना काम मिळेल.
खत निर्मिती प्लांटसाठी पाठपुरावा आशिष यांनी केला असून येत्या काळात तो ही होईल. पर्यटनाला चालना देण्यासाठी इको सिस्टिम तयार करून येथे मोठे पर्यटन केंद्र उभे करू असे वचन फडणवीस यांनी दिले. सिंचनक्षेत्रात उल्लेखनीय काम महायुती आणि मोदी सरकारच्या मदतीने झाले आहे. 1880 कोटींच्या कन्हार नदी वळण योजनेला मान्यता दिली. नळगंगा वैनगंगा योजनेमुळे विदर्भातील 10 लाख एकर जमीन ओलिताखाली येणार आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.