मुंबई : भारताचे संविधान हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले हा गैरसमज आहे. त्यांनी केवळ लेखनिक म्हणून काम केले. संविधान तयार करण्यात 377 जण सहभागी होते, असे संतापजनक उद्गार काढून घटनाकार डॉ. आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या मौलाना सज्जाद नोमानी यांच्यावर ॲट्रॉसिटीअन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विजय (भाई) गिरकर यांनी सोमवारी केली. नोमानी यांची ही विधाने मान्य आहेत का हे दलित चळवळीतील सर्वच नेत्यांनी जाहीर करावे असे आव्हानही श्री. गिरकर यांनी दिले. भाजपा मीडिया सेंटरमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेला प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या संविधानाची जी छोटेखानी प्रत घेऊन फिरत आहेत ती त्यांनी वाचलेली नाही. ती वाचली असती तर त्यात जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यावर प्रकाशकाने ओढलेले ताशेरे त्यांना वाचायला मिळाले असते. डॉ बाबासाहेबांनी नेहरू आणि समाजवादी लोकांच्या दडपणाला न जुमानता स्वतंत्रपणे संविधान लिहिलेले आहे. आता नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यावर टीका केलेल्या संविधानाचीच प्रत राहुल गांधी फिरवत असल्याचे गिरकर म्हणाले.
नागपूर येथे त्यांनी संविधानाची जी प्रत दाखवली त्यात सारी कोरी पाने होती. त्यांचेच खासदार वेणूगोपाल यांनी त्यात नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यावर टीका केलेली आहे. त्यांना ठाऊक नाही की डॉ. बाबासाहेब संविधान समितीवर गेले आणि त्यांनी संविधान लिहिले. 1950 ला भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर डॉ. बाबासाहेबांनी जेव्हा 1952 साली मुंबईतून आणि त्यानंतर 1954 मध्ये भंडारा येथून पोटनिवडणूक लढवली तेव्हा जर काँग्रेस आणि नेहरूंनी ठरवले असते तर घटना लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेबांना त्यांनी बिनविरोध निवडून आणले असते. पण तसे न करता दोन्हीवेळा नेहरूंनी प्रयत्नपूर्वक डॉ. बाबासाहेबांना पराजित करून त्यांचा अपमान केला. इतकेच नव्हे 1990 सालापर्यंत डॉ. बाबासाहेबांना भारतरत्न दिले गेले नाही, त्यांचे तैलचित्र संसद भवनात लावले गेले नव्हते. तसेच नवबौद्धांना केंद्रात सवलती दिल्या नव्हत्या. डॉ. बाबासाहेब हयात असताना आणि त्यांच्या महानिर्वाणानंतरही काँग्रेसने डॉ. बाबासाहेबांना कायम अपमानीत केल्याचे श्री. गिरकर यांनी नमूद केले.
1990 मध्ये व्ही.पी. सिंग सरकार केंद्रात आल्यानंतर डॉ. बाबासाहेबांना भारतरत्न देण्यात आले, त्यांचे तैलचित्र संसदेत लावण्यात आले आणि नवबौद्धांचा अनुसूचित जातीमध्ये समावेश झाल्याने त्यांना सरकारी नोकऱ्या मिळू लागल्या. म्हणजेच तोपर्यंत नवबौद्धांच्या तीन पिढ्या बरबाद झाल्या. त्यांना शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये सवलती मिळाल्या नाहीत, असे त्यांनी निदर्शनास आणले.
1961 साली जातीवर आधारित आरक्षण म्हणजे विकासात अडथळा, असे म्हणत नेहरूंनी आरक्षणाला विरोध केला होता. त्यानंतर राजीव गांधी आणि अलीकडे राहुल गांधी यांनीही आरक्षणविरोधी वक्तव्ये केल्याची आठवण करून देत गिरकर म्हणाले की, 1975 साली आणीबाणी लादून इंदिरा गांधी यांनी वेगवेगळ्या मूलभूत अधिकारांवर गदा आणली होती आणि त्याला विरोध करणाऱ्यांचा अनन्वित छळ केला होता. घटना दुरुस्ती करून घटनेचा पाया खच्ची करण्याचेही काम त्यांनी केले. आता महाविकास आघाडीला पाठिंबा देताना संविधान समितीमध्ये 377 जण होते मग डॉ. बाबासाहेबांनी संविधान लिहिले हे कसे काय असा प्रश्न विचारणाऱ्या नोमानी यांनी कुठल्याही व्यासपीठावर यावे आणि चर्चा करावी असे आव्हानही यावेळी त्यांनी दिले आणि संविधान लिहिण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब यांनी उत्तमपणे पार पाडल्याने त्यांचे कसे कौतुक झाले होते याचे दाखले त्यांनी यावेळी दिले.