तब्बल १०३ विधानसभा मतदारसंघात सभा आणि बैठका
मुंबई: शिवसेनेचे युवा नेते आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल १०३ विधानसभा मतदारसंघांमध्ये बैठका, मेळावे आणि सभांना संबोधित केले आहे. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी ६२ तर निवडणूक काळात ४१ हून अधिक मतदारसंघांमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भेट देत प्रचार केला.
शिवसेनेचे युवा नेते आणि खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे विधानसभेच्या निवडणुकी वेळी महाराष्ट्रभर सभा बैठका आणि मेळावे घेत होते. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासूनच श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना संघटना बांधणी आणि संभाव्य मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटी, बैठका आणि मिळावे घेण्यास सुरुवात केली होती. निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याच्या रॅली आणि त्यानंतरच्या प्रचार सभांमध्ये श्रीकांत शिंदे सहभागी होते. कोपरी पाचपाखाडी, कल्याण ग्रामीण, कळवा मुंब्रा, डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण पूर्व, उल्हासनगर, कल्याण पश्चिम, भिवंडी तालुका आणि पालघर जिल्ह्यातील विधानसभा, मुंबईतील मागाठाणे, दिंडोशी, जोगेश्वरी, वरळी, मुंबादेवी, शिवाजीनगर, विक्रोळी, भांडुप, धारावी, कलिना, तर कोकणातील गुहागर, राजापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील आणि आसपासच्या भागातील चार विधानसभा, धाराशिव, उमरगा, परभणी, लोहा, कंधार, अक्कलकुवा, साखरी, पाचोरा, नेवासा, सांगोला, भंडारा अशा विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मेळावा आणि सभेला संबोधित केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सव्वा दोन वर्षाच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, युवा कार्यप्रशिक्षण, शेतकऱ्यांसाठीच्या योजना, महिलांसाठीच्या योजना, विविध निर्णय, पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची माहिती देत प्रचार केला. यात विरोधकांना त्यांनी धारेवर धरले. त्यांच्या सभांना जोरदार प्रतिसाद मिळाला.