मुंबई : विधानसभा निवडणूकीसाठी भाजपच्या राष्ट्रीय नेत्यावर पैसे वाटल्याचे गंभीर आरोप झाले. त्यानंतर विरोधी नेत्यांनी तावडेंसह भाजपवर जोरदार टीका केली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार यांनी विनोद तावडे चांगले गृहस्थ असल्याचा दुजोरा देत आरोप सिद्ध झाल्यावर प्रतिक्रिया देणार असल्याची स्पष्टोक्ती दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप झाला. या प्रकरणानंतर राज्यातील विरोधी पक्षातील नेते तावडेंवर टीका करताना त्यांना पक्षातीलच नेत्याने अडकवल्याचे म्हणत निशाणा साधत आहेत. मात्र, शरद पवार यांनी कोणतीही टीका न केल्याने तावडे यांनी त्यांचे धन्यवाद मानले. यावेळी बोलतांना तावडे म्हणाले शरद पवार परिपक्व आणि ज्येष्ठ नेते आहेत. मला ते जवळून ओळखतात, मी अशा प्रकरणामध्ये असू शकत नाही त्यांना माहीत आहे. त्यामुळे मी त्यांचे धन्यवाद मानतो, असे विनोद तावडे म्हणाले. यावेळी बोलताना नालासोपा-यामध्ये जाणार असल्याची कोणालाही माहिती नसल्याचे तावडेंनी सांगितले.
मी नालासोपारा येथे जाणार हे कोणालाच माहिती नव्हते, कारण मी पालघरमधील वाडा येथून निघालो असताना त्यावेळी उमेदवार राजन नाईक यांना फोन केला आणि काय चाललेय अशी माहिती घेतली. त्यावेळी आम्ही कार्यकर्त्यांसह बसलो आहोत चहा घ्यायला या. तेव्हा दहा ते बारा कार्यकर्ते बसले आहेत म्हणून मी गेलो होतो. हे कोणतंही षडयंत्र नव्हतं ना आमच्यात वैयक्तिक कोणते मतभेद आहेत. विरोधकांना हार दिसत असल्याने त्यांनी या गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या अधिका-यांना कोणतेही पैसे सापडले नाहीत. संजय राऊत हे खोटं बोलत असल्याचे विनोद तावडे म्हणाले. त्यांनी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांचे का धन्यवाद मानले.