मुंबई : राज्यात सत्तेची चावी कुणाच्या हाती महायुती, महाविकासआघाडी? याचं चित्र अवघ्या काही तासांतच स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या गोटात हालचालींना प्रचंड वेग आला आहे. विधानसभेच्या निकालापूर्वी सागर बंगल्यावर घडामोडींना वेग आला असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. यात महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, पराग शाह, मिहिर कोटेचा, कालिदास कोळंबकर, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, या प्रमुख नेत्यांचा समावेश होता.
राज्यातील निकालाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर भाजपचे राजकीय खलबतं होत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या बैठकीत मनसेचे नेते आणि उमेदवार बाळा नांदगावकरही सहभागी झाले आहेत. राज्यात भाजप आणि महायुतीला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास पुढील रणनीती काय असू शकेल, यासंदर्भात सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांनी भाजप नेत्यांची बैठक बोलावली असल्याची शक्यता आहे. निकालानंतर सर्व आमदारांना एकत्र करण्यासाठी विशेष जबाबदारी काही नेत्यांवर या बैठकीत दिली जाण्याचे शक्यता आहे. गिरीश महाजन, प्रसाद लाड, प्रवीण दरेकरांनी देखील यावेळी आपली उपस्थिती दर्शवली आहे.
महायुतीमध्ये तिन्ही पक्षांची सध्या सार्वजनिकरित्या कोणतीही बोलणी सुरु नाही. मात्र, शुक्रवारी सकाळी भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी दाखल झाले आहेत. अपक्षांशी आणि छोट्या पक्षांशी बोलणी करुन सर्व गणितं जमवायची आहेत. उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. दुपारी निकाल स्पष्ट झाल्यानंतर महायुती अपक्ष आणि बंडखोरांशी बोलणी सुरु करेल. त्या दृष्टीने सागर बंगल्यावरील आजची बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. राज्यात महायुतीच सरकार येईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवला आहे.