राजकारणाचा खालावलेला दर्जा चिंताजनक..आमदार हितेंद्र ठाकूर यांचे परखड मत

0

वसईः गेल्या दोन, पाच वर्षांतील राज्यातील राजकारणाचा खालावलेला दर्जा पाहता, स्वतःला आमदार म्हणवून घेण्याचीही लाज वाटते, असे परखड मत यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी बोलतांना व्यक्त केले. कोण कुठल्या पक्षात नि त्या पक्षाच्या कुठल्या गटात आहे, हेच कळेनासे झाले आहे. या पार्श्वभूमीवर डॉमनिक घोन्सालवीस यांनी तत्व, विचार आणि एकनिष्ठेच्या राजकारणाचा जगलेला आणि अनुभवलेला काळच समाजाला योग्य दिशा दाखवणारा होता. विरोधी पक्षात राहूनही विचारधारा, निष्ठा कायम ठेवत सत्ताधार्‍यांकडून समाजहिताची कामे करून घेणे, हे डॉमनिक घोंन्सालवीस साहेबांकडून शिकावे, असेही आमदार ठाकूर यावेळी म्हणाले.*

*पालघर जिल्ह्यातील सहकार महर्षी, तथा वसईचे 93 वर्षीय माजी आमदार डॉमनिक घोन्सालवीस यांच्या ’जीवनसंघर्ष’ या आत्मचरित्र प्रकाशनानिमित्त त्यांचा विविध पक्षीयांच्यावतीने माणिकपूर येथील वायएमसीए सभागृहात जाहीर सत्कार करण्यात आला. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहोळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून वसईचे आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडो, माजी खासदार बळीराम जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बबनशेठ नाईक, माजी महापौर नारायण मानकर, प्रवीण शेट्टी, ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, डॉ. संतोष पिल्ये, बॅसीन कॅथॉलिक बँकेचे अध्यक्ष बॅनॉल्ड डायस, वसई विकास बँकेचे अध्यक्ष आशय राऊत, डिंपल प्रकाशनचे अशोक मुळे उपस्थित होते. यावेळी डिंपल प्रकाशन द्वारा प्रकाशित माजी आमदार डॉमनिक घोन्सालवीस यांच्या ’जीवनसंघर्ष’ या आत्मचरित्राचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

स्व. साने गुरुजींची शिकवण, मृणालताई गोरे, म. वि. कुलकर्णी, स. गो. वर्टी  आणि स्व. पंढरीनाथ चौधरी यांच्यासारख्या निःस्पृह नेत्यांच्या मार्गदर्शनात आपला राजकीय, सहकार आणि सामाजिक प्रवास घडत गेला. प्रदीर्घ काळ सत्तेत नसूनही, केवळ सहकारातील योगदानामुळे सर्वसामान्य जनता आणि आजी माजी लोकप्रतिनिधीचे प्रचंड प्रेम आजपर्यंत मिळत आले. समाज आणि कुटुंबीयांनी योग्य साथ दिली, यासाठी सर्वांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना असल्याचे माजी आमदार डॉमनिक घोन्सालवीस यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले. वसई पान मार्केटिंग सहकारी संस्थेचे अध्यक्ष रोहन घोन्सालवीस यांनी प्रस्ताविक, तर सूत्रसंचालन अश्विनी भोईर यांनी केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech