सातारा : राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच कराड दक्षिणमधील काँग्रेस पक्षाचे उमेदवार पृथ्वाराज चव्हाण यांचा प्रतिस्पर्धी पक्षाच्या उमेदवारांनी दारून पराभव केला. त्यामुळे राज्यभरातील महाविकास आघाडीच्या अपयशावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना निकाल धक्कादायक असल्याचे म्हटले. ते म्हणाले, ३०-४० हजारांचा एकसारखा मत फरक संशयास्पद वाटतो. लोकशाहीत निकाल मान्य करणे आवश्यक आहे, पण यामागची कारणे शोधली पाहिजेत अशा शब्दांत मत व्यक्त केले आहे. ते पुढे म्हणाले की, लोकसभेच्या यशानंतर लोकांना गृहीत धरले नाही, मात्र रणनीतीतील त्रुटी नाकारता येत नाहीत.
मविआने कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. उलट भाजपने समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला.हरियाणा निकालांचा सकारात्मक परिणाम भाजपला मिळाला, तर ‘लाडकी बहीण’ योजनेने महायुतीला मोठा फायदा दिला. मराठा आंदोलनाच्या धरसोड वृत्तीमुळे त्याचा राजकीय प्रभाव कमी झाला, असेही चव्हाण म्हणाले.महाविकास आघाडीने निवडणुकीत चुका केल्या का, यावर सविस्तर चर्चा करून योग्य दिशा ठरवावी लागेल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. कराडकरांसाठी सेवा सुरूच राहणार कराड दक्षिणच्या जनतेने मला अनेकदा संधी दिली. परंतु यावेळी मतदार का नाराज झाले, हे समजून घ्यावे लागेल. कोणत्याही पदावर नसतानाही मी जनतेची सेवा सुरू ठेवणार आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.