मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीच्या विजयानंतर नवनिर्वाचित आमदारांची बैठक मुंबईत झाली. यावेळी अजित पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आल्याची घोषणा भुजबळ यांनी केली. . तसेच मुख्यमंत्रिपदाबाबत विचारताना भुजबळ म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आमचा कोणताही विरोध नाही. राज्यपालांच्या आमंत्रणानंतर मंत्रिमंडळाचे वाटप होईल. मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना भुजबळ म्हणाले की, जरांगे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मला हरवण्यासाठी मराठा समाजाला आवाहन केले. यामुळे माझ्या मताधिक्यावर परिणाम झाला. मात्र इतर अल्पसंख्याक समाज माझ्या बाजूने एकत्र आला. मराठा समाजाचाही महायुतीला पाठिंबा मिळाल्याचे दिसून आले.
महायुतीच्या यशामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या एकत्रित प्रयत्नांचे योगदान असल्याचे भुजबळ म्हणाले. महिलांच्या विशेष आर्थिक लाभांमुळे महिलांचा विश्वास मिळाला, छगन भुजबळ यांनी महायुतीच्या यशावर भाष्य करताना महिलांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. भुजबळ यांनी महायुतीतील यशाचे श्रेय सर्व घटकांना देत, महिलांच्या भूमिकेवर विशेष भर दिला. त्यामुळे या निवडणुकीत महिलांचे मतदान अधिक झाले. महिलांच्या मतदानामुळे पुरुष मतदारांवरही प्रभाव पडल्याचे त्यांनी सांगितले.