६ डिसेंबरपूर्वी बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा अभिवादनासाठी खुला असावा !

0

कायद्याने वागा लोकचळवळीची मागणी

मुंबई : निवडणुकीच्या धामधुमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं पर्यवेक्षण, तांत्रिक परीक्षण, तपासणी राहून जायला नको. ते काम तातडीने व्हावं. पुतळ्याच्या योग्यतेची, कामाच्या मजबुतीची, सक्षमतेची खात्री करावी, आवश्यकता भासल्यास उपाययोजना व्हाव्यात, पण कोणत्याही परिस्थितीत ६ डिसेंबर रोजी उल्हासनगरातील बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा नागरिकांना अभिवादनासाठी खुला असावा, यासाठी पावलं उचलावीत, अशी मागणी कायद्याने वागा लोकचळवळीने उल्हासनगरातील सुभाष टेकडी येथील पुतळ्याबाबत मनपा आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे केली आहे.

उल्हासनगर महानगर पालिकेकडून मूलभूत सुविधा निधीतून उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याबाबत अक्षम्य दिरंगाई झालेली आहे. या कामाचा अंदाजित खर्च १ कोटी रुपये इतका ठरवण्यात आलेला होता. अंतिमतः ८५ लाखांच्या खर्चाची निश्चिती झालेली असली तरी, सदरच्या कामात २५-३० लाखांइतकाही खर्च न झाल्याचं व भ्रष्टाचार झाल्याचं प्रथमदर्शनीच दिसून येत आहे. त्याची चौकशी व्हावी, अशी मागणीही कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी आयुक्तांना दिलेल्या लेखी निवेदनात केली आहे.

सुभाष टेकडी येथील सदर ठिकाणी अनेक वर्षांपासून अर्धपुतळा होता. त्या अर्धपुतळ्याच्या प्रेरणेनेच आजवर स्थानिक नागरिकांची वाटचाल झाली. तिथून हाकेच्या अंतरावर तक्षशिला विद्यालयाच्या प्रांगणात पूर्णाकृती पुतळा असताना, नव्या पूर्णाकृती पुतळ्याची काहीही गरज नव्हती. पण विचारांपेक्षा स्वार्थी राजकारण सरस ठरलं. पूर्णाकृती पुतळ्याचं काम हाती घेण्याच्या काही दिवस आधीच अर्धपुतळ्याच्या चबुतऱ्याचं नूतनीकरण झालेलं होतं. ते वाया गेलं. पूर्णाकृती पुतळ्याचं काम मंजूर झाल्यानंतरही सदरचं काम रखडून राहिलेलं होतं. इतक्या वर्षात यंदा पहिल्यांदाच १४ एप्रिल रोजी सुभाष टेकडी चौकात आंबेडकर जयंती साजरी झाली नाही, कारण पुतळा जागेवर नव्हता, ही बाब असरोंडकर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणली आहे.

विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच रातोरात अंधारात चोरीलबाडीने पुतळा आणून चबुतऱ्यावर बसवण्यात आला. या सर्व कामाचं जे अभियांत्रिकी मूल्यमापन, नियमन, नियंत्रण व्हायला हवं होतं, ते करण्यात आलेलं नाही. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत घडलेली दुर्घटना डोळ्यासमोर असतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याबाबत अक्षम्य तितकाच संतापजनक बेजबाबदारपणा कंत्राटदार व मनपा प्रशासनाकडून करण्यात आलाय. हा पुतळा उद्या कोसळला तर कोण जबाबदारी घेणार आहे ? असा सवालही असरोंडकर यांनी केलाय.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech