नाशिक : कांद्याची बाजार पेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीसह जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याच्या भावात चढउतार होत असून कांद्याचे बाजारभाव सरासरी दर ४,००० ते ५,००० रुपयांच्या दरम्यान चढ उतार होत आहेत. यातच खरिपातील कांद्याची आवक अजून वाढली नसून लेट खरिपातील लागवड घटल्यामुळे कांद्याचे बाजार भाव आणखीन काही आठवडे टिकण्याचा अंदाज आहे. आवकेत घट झाल्यामुळे सध्या बाजारात उपलब्ध कांद्याचे प्रमाण फारच कमी असून रब्बी व खरीप असे कांदा आवकेचे गणित असते. यंदा खरिपातील कांदा लागवड वाढली असली तरी पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच लेट खरिपातील कांदा लागवडीत ही घट झाली आहे. तर, येत्या आठवड्यांमध्ये खरीपाची आवक वाढणार गेल्या रब्बी हंगामात कांद्याचे उत्पादन घटल्याने यंदा बाजारातील आवक कमी आहे. यामुळे सध्या रब्बीतील कांदा उपलब्धता कमी असून खरीपातील कांदा उशिरा येत आहे. ज्यामुळे बाजारात सध्या कांद्याची उपलब्धता कमी राहणार असून पुढील काही आठवड्यांमध्ये खरिपातील कांद्याची आवक वाढण्यास सुरुवात होईल अशी स्थिती आहे.
खरिपातील कांदा लागवड साधारणपणे जून व जुलै महिन्यात होत असते त्याची काढणी ऑक्टोबर पासून सुरू होते. परंतु यंदा जून आणि जुलै महिन्यात रोपलावण्यासाठी अनेक भागांमध्ये उपलब्ध झाले नव्हते. त्यामुळे लागवड उशिरा सुरू झाली. तर लेट खरिपाची लागवड सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात होत असून त्याची काढणी डिसेंबरनंतर होते. तर रब्बीची लागवड डिसेंबरनंतर होते व काढणी मार्चपासून सुरू होते. लेट खरीपाच्या लागवड क्षेत्रात घट राज्यात मागील हंगामात खरीपात २ लाख ८५ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. परंतु यंदा लागवड वाढवून ३ लाख ८२ हजार हेक्टर वर पोहोचली. त्यामुळे लागवड क्षेत्र जवळपास एक लाख हेक्टरने वाढले होते. परंतु ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. खरीपातील लागवड वाढली असली, तरी लेट खरीपाची लागवड कमी झाली आहे. शिवाय गेल्या हंगामात लेट खरीपाची १ लाख ६६ हजार हेक्टर वर लागवड झाली होती. मात्र यंदा ५५ हजार हेक्टर एवढीच लागवड झाली आहे.