मुंबई : मुंबईत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीत शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तसेच आमदार भास्कर जाधव यांच्याकडे शिवसेना गटनेता, तर आमदार सुनील प्रभू यांच्याकडे प्रतोदपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या निवडीला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांसमोर दुजोरा दिला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाला अवघ्या २० जागा मिळाल्या. त्यानंतर आता आगामी काळात विधीमंडळाचे कामकाज सुरू होईल.
ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित आमदारांची सुनील प्रभू मुंबईचे माजी महापौर आहेत. ते उद्धव ठाकरेंचे अतिशय विश्वासू मानले जातात. सध्या ते दिंडोशीतून विधानसभेवर निवडून गेले आहेत. पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरेंनी विधानसभेच्या गटनेतेपदी शिवडीचे आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती. पण आता त्यांच्या जागी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांची निवड करण्यात आली आहे. जाधव सहाव्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत. आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होते, तेव्हा त्यांनी तालिका अध्यक्ष पदावर असताना भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन केलं होतं. जाधव यांनी केलेली ती कारवाई बरीच गाजली होती.