रश्मी शुक्ला यांची  पोलीस महासंचालक पदावर पुनर्नियुक्ती 

0

मुंबई :  विधानसभा निवडणुका संपल्यानंतर तातडीने आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक (DGP) पदावर पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य गृहविभागाने सोमवारी सायंकाळी जारी केलेल्या आदेशानुसार, त्यांच्या सक्तीच्या रजेचा कालावधी संपवण्यात आला आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर रश्मी शुक्ला यांना हटवून संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली होती. निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतरच शुक्ला यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावर काँग्रेसने आक्षेप घेतला असला तरी, शुक्ला यांनी यास केवळ शुभेच्छा भेट असे संबोधले आहे.

रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असून, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनण्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्यांनी यापूर्वी सशस्त्र सीमा बल महासंचालकपदही भूषवले आहे. वयाच्या २२व्या वर्षी आयपीएस होण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे. महाविकास आघाडीच्या काळात राज्य गुप्तचर विभाग प्रमुख असताना, काही वरिष्ठ नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यात संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे नाव प्रामुख्याने आले होते. शुक्ला यांना निवृत्तीनंतर मुदतवाढ देण्यात आल्याने हा निर्णय सरकारच्या राजकीय रणनीतीशी जोडला जात आहे. निवडणुका संपताच झालेल्या या पुनर्नियुक्तीने विविध चर्चांना उधाण आले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech