सोलापूर : यंदा माऊलींच्या पहाटपूजेचा मान हा नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिंपी टाकळी या गावच्या लोखंडे या दाम्पत्याला मिळाला. पहाट कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळा,कार्तिकी एकादशीची पहाटपूजा पहाटे एक वाजता समाधीवर पवमान अभिषेक व दुधारती अकरा ब्रम्हवृन्दांच्या वेदघोषात संपन्न झाली. पुजेसाठी दर्शन बारी बंद केल्या नंतर दर्शनबारीत असणाऱ्या पहिल्या वारकरी दाम्पत्याला हा मान दिला जातो लोखंडे दाम्पत्य याचे मानकरी ठरले.अशोक मनोहर लोखंडे (वय.५५),अलका अशोक लोखंडे (वय.५२) असं या दाम्पत्याच नाव आहे.रात्री साडे बारा वाजता समाधी दर्शन बंद करण्यात आले.तदनंतर संपूर्ण मंदिर स्वच्छ करण्यात आले.बाराच्या सुमारास पास धारकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला.
स्वकाम सेवा मंडळ,फिनिक्स ग्लोबल सर्व्हिसेस व इतर स्वयंसेवी संस्थांच्या वतीने मंदिरात स्वच्छता करण्यात आली.रात्री पावणे एक वाजता मुख्य महापुजा व पवमान अभिषेकास सुरुवात झाली माउलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पंचामृत अभिषेक करण्यात आला. त्यासाठी दूध, दही, तूप, मध, साखर, आम्रखंड, सुगंधी तेल, उटणे, अत्तर यांचा वापर करण्यात आला. केशरी मेखला, शाल, तुळशीचा हार आणि डोईवर चंदेरी मुकुट ठेवून समाधीला आकर्षक रूप देण्यात आले. अकरा ब्रह्मवृंदाच्या वतीने रुद्राभिषेक करण्यात आला.दीड वाजता अभिषेक उरकल्या नंतर पूजेचा मान लाभलेल्या लोखंडे दाम्पत्याला दर्शनाचा मान देण्यात आला. पावणे दोन वाजता धुपारती होऊन समाधीचे दर्शन खुले करण्यात आले.