“संविधान म्हणजे लोकशाहीचा मजबूत पाया”- राष्ट्रपती

0

नवी दिल्ली : भारतीय संविधान लोकशाहीचा मजबूत पाया आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी केले. संविधान दिनानिमित्त संसदेच्या दोन्ही सभागृहांना संयुक्तपणे संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय संविधानाबद्दल आदर व्यक्त करुन संविधानाचे महत्व अधोरेखित केले. याप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, पंच्याहत्तर वर्षांपूर्वी याच दिवशी ‘संविधान सदन’च्या याच सेंट्रल हॉलमध्ये संविधान सभेने राज्यघटना तयार करण्याचे कार्य पार पाडले. स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सर्व नागरिकांनी ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा केला. पुढील वर्षी 26 जानेवारीला आपण आपल्या प्रजासत्ताकाचा पंच्याहत्तरावा वर्धापन दिन साजरा करू. अशा उत्सवांमुळे एकात्मता मजबूत होते.भारतीय राज्यघटना ही काही महान विचारवंतांनी केलेल्या सुमारे तीन वर्षांच्या विचारमंथनाचे फलित आहे. तसेच खऱ्या अर्थाने ते आपल्या प्रदीर्घ स्वातंत्र्यलढ्याचे फलित आहे, असे त्यांनी सांगितले. जुन्या संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभा सभापती जगदीप धनखड, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे मंचावर उपस्थित होते.

भारतीय राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या कार्यक्रमात विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. “भारतीय संविधानाची निर्मीती: एक दृष्टीक्षेप” आणि “भारतीय संविधानाची निर्मिती आणि प्रवास” या दोन पुस्तकांचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संस्कृत आणि मैथिली या 2 भाषेमध्ये भारतीय संविधानाच्या प्रतीचे प्रकाशन करण्यात आले. कार्यपालिका, विधिमंडळ आणि न्यायपालिका तसेच सर्व नागरिकांच्या सक्रिय सहभागातून आपल्या घटनात्मक आदर्शांना बळ मिळते, असे राष्ट्रपती म्हणाल्या. राज्यघटना हा जिवंत आणि प्रगतीशील दस्तावेज आहे. देशात 2015 पासून दरवर्षी ‘संविधान दिवस’ साजरा केल्यामुळे आमच्या तरुणांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता वाढण्यास मदत झाली आहे, असे त्यांनी सांगितले. शेवटी राष्ट्रपतींनी सर्व मूलभूत कर्तव्ये पाळण्याचे आणि ‘विकसीत भारत’ निर्माण करण्याच्या राष्ट्रीय ध्येयाप्रती समर्पण बाळगण्याचे आवाहन केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech