मुख्यमंत्रीपदापेक्षा महाराष्ट्राच्या विकासासाठी भूमिका महत्त्वाची – चंद्रशेखर बावनकुळे

0

नागपूर : महायुतीचे सरकार मजबूत आणि अभेद्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी भूमिका घेतली, ती राज्याच्या 14 कोटी जनतेसाठी एक मोठी भूमिका असून आम्ही स्वागत करतो. आमची लढाई मुख्यमंत्रीपदासाठी नाही तर महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणसाठी असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांची भूमिका महाराष्ट्राला पुढे नेणारी आहे. कार्यवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, बुधवारी पत्रकार परिषद घेऊन राज्यात सत्ता स्थापनेसाठी भाजपचे केंद्रीय नेतृत्त्व घेईल तो निर्णय मान्य असल्याचे जाहीर केले. शिंदेंच्या या भूमिकेमुळे विरोधक तोंडघशी पडल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. शिंदेंच्या घोषणेनंतर लगेच बावनकुळे यांनी पत्रकार परिषद बोलावून एकनाथ शिंदेच्या भूमिकेचे कौतुक केले. यावेळी बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्रीपदापेक्षा महाराष्ट्राच्या विकासासाठी भूमिका महत्त्वाची असल्याने विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राला अधिक बळकटी मिळाली आहे.

शिंदेंचे कौतुक करताना बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना एकनाथ शिंदे यांनी एक मंत्री म्हणून उत्कृष्ट काम केले. देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्याला खंदा लाऊन समृद्धी महामार्गासारखा मोठा महामार्ग पूर्ण केला. उद्धव ठाकरे यांनी भाजपाला धोका दिला. हे शिंदे यांना पटले नाही आणि त्यासाठी हिंदुत्वाची भूमिका घेऊन, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारला पुढे घेऊन महायुतीचे सरकार सत्तेत आणण्यासाठी मोठी भूमिका घेतल्याचे बावनकुळेनी सांगितले. महायुतीच्या अभूतपूर्व विजयात तिन्ही नेते आणि सर्व घटक पक्षांची मेहनत असून त्यामुळे मोठा जनादेश मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांनी कणखर मुख्यमंत्री म्हणून मागील अडीच वर्षे काम केले असून समाजाच्या प्रत्येक घटकाला व महाराष्ट्राच्या विकासाला न्याय दिला. युती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या योजनांना बंद करण्याचे काम महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले होते. परंतु, बंद पडलेल्या विकास प्रकल्पांना गती देण्याचे काम मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech