मोदी-शाह जो निर्णय घेतील, तो मान्य! आमचे समर्थन – एकनाथ शिंदे

0

बाळासाहेबांचं स्वप्न मोदी आणि शाहांनी पूर्ण केलंय, धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो…

ठाणे : मी महाराष्ट्रातल्या जनतेला धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो, हा सर्वांत मोठा विजय आहे, महायुतीचा विश्वास, विकास कामे जी महाविकास आघाडीने थांबवली ती आम्ही सुरू केली, विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली. मोठ्या प्रमाणावर हा विजय जनतेचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांसह भाजप जो निर्णय घेईल, तो एकनाथ शिंदे म्हणून आणि शिवसेना म्हणून मान्य असेल. बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं, शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचं ते स्वप्न मोदी आणि शाहांनी पूर्ण केलंय, त्यामुळे महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय होईल, तो निर्णय मान्य असेल, अशी स्पष्ट भूमिका काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. ते ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपचा, महायुतीचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी जो काही निर्णय घेतील, त्यासाठी आमचे समर्थन आहे, असेही ते म्हणाले.

आम्ही सर्व प्रश्न सोडवले, काहीच ठेवले नाहीत. राज्याच्या प्रगतीचा वेग बघा, राज्य एक नंबरला नेण्याचा काम आम्ही केले. मागच्या अडीच वर्षात राज्य तिसऱ्या नंबरला गेले. आम्ही आल्या आल्या ते पहिल्या नंबरला आणले. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून माझी ओळख झाली, ही ओळख मला मोठी वाटते, मी समाधानी आहे. ‘जीवन में असली उडान बाकी है अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन अभी तो सारा असमान बाकी है’, या शेर मधून त्यांनी पुढचं चित्र स्पष्ट केले. अजून खूप काम करायचं आहे. राज्याला विकासाकडे न्यायचं आहे. मोदींनी देशाचं नाव जगभर रोशन केलं. आज देश आत्मनिर्भर झाला आहे. आत्म सन्मान झाला आहे. आपले रिलेशन इतर देशांसोबत डेव्हलप झाले आहेत. त्याचा फायदा महाराष्ट्राला होईल. त्यामुळे कोणती कोंडी काही राहू नये हे सांगण्यासाठी बोलावलं आहे. त्यामुळे वरिष्ठ जे निर्णय घेतील, तो मान्य असेल. भाजपाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. आमची बैठक होणार आहे. भाजपाची बैठक होणार आहे. त्यात ते निर्णय घेतील. कोंडी, अडसर, नाराजी नाही आहे. स्पीड ब्रेकर नाही. नाराजी नाही. जो निर्णय भाजपचे दिल्लीतील नेते घेतील त्याला आमच्या शिवसेनेचा पाठिंबा आहे, असे त्यांनी जाहीर केले आहे.

आम्ही नाराज होऊन रडणारे नाही लढणारे लोक आहोत. माझ्या रक्ताचा शेवटच थेंब असे पर्यंत मी जनतेसाठी काम करेन. मी जीव तोडून काम केलं, त्यामुळेच हे यश प्राप्त झालं. मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेला काय मिळालं ते महत्त्वाचं आहे. शिंदे पुढे म्हणाले, उद्या मोदी, शाह यांच्याबरोबर मी, अजित पवार, फडणवीस यांची बैठक आहे. त्या बैठकीत आम्ही सरकार संदर्भात निर्णय घेऊ. निवडणुकीच्या वेळी आम्ही मोठ्या प्रमाणात काम केले. रात्रभर काम करायचो, 2-3 तास झोपायचो आणि पुन्हा काम करायचो. मी मोजल्या नाहीत पण 70-80 सभा घेतल्या. मी आधी देखील कार्यकर्ता म्हणून काम केले पुढे देखील करेन. मुख्यमंत्री म्हणजे कॉमन मॅन म्हणून मी काम केले, तीच माझी धारणा होती, म्हणून लोकांपर्यंत पोहोचू शकलो. मी देखील सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे, शेतकरी कुटुंबातून आलो आहे. लाडके भाऊ, शेतकरी, लाडक्या बहिणी अशा सर्वांसाठी काही ना काही करायचे होते.

कुठे घोडे अडले नाही, मी मोकळ्या मनाचा माणूस आहे, ताणून ठेवणारा माणूस नाही. मला सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ हे मोठं पद मला नशिबाने मिळालं आहे. म्हणून मी मोदींना फोन करुन सांगितलं की सरकार बनवताना किंवा निर्णय घेताना कोणतंही अडचण माझ्यामुळे येणार नाही, तुम्ही आम्हाला मदत केली, संधी दिली, त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या, तो महायुतीचे आणि एनडीएचे प्रमुख म्हणून तुमचा निर्णय भाजपसाठी अंतिम असेल तसंच तो आमच्यासाठीही अंतिम असेल, असं सांगितलं. सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या लोकांना ते कसे कळणार. मी आनंदी आहे, खुश आहे. केंद्रातून मोदी शाह यांचे पूर्ण पाठबळ आम्हाला होते. मला ते दिवस आठवतात जेव्हा मला मुख्यमंत्री करत होते. मोदी आणि अमित शाहांना मी फोन करुन सांगितलं, असं एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितलं.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech