पुणे : आळंदी येथे १८ वे वारकरी महाअधिवेशन आणि धर्मसभा पार पडली. त्या प्रसंगी त्यांनी हे आवाहन केले. हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय वारकरी परिषद आणि वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने पू. अमृताश्रम स्वामी महाराज (दंडी स्वामी) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनात वारकर्यांनी ‘धर्मजागर’ करण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत प्रथमच हिंदूंनी जात-पात, संप्रदाय यांसह कशातच न अडकता हिंदु धर्मीय म्हणून हिंदुत्वाच्या सूत्रावर मतदान केले. जे हिंदु धर्माचे रक्षणकर्ते आहेत अशांना सत्तेपर्यंत पोचवणे यालाच आजच्या काळातील धर्मसंस्थापना म्हणता येईल. सद्यस्थितीत बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहे, त्यामुळे संकट आता आपल्या उंबरठ्यापर्यंत आले आहे. तरी यापुढील काळात हिंदूंनी सजग राहून जात-पात, संप्रदाय यांच्यावर येऊन राष्ट्र आणि धर्मकार्यासाठी हिंदुत्वाची वज्रमूठ सिद्ध करावी, असे आवाहन अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. गोविंददेव गिरी यांनी केले.
‘हरिद्वार’ आणि ‘ऋषिकेश’ या तीर्थक्षेत्रांच्या धर्तीवर श्रीक्षेत्र पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण आदी तीर्थक्षेत्रे यांसह राज्यातील सर्व मंदिरे, तीर्थक्षेत्रे यांचा परिसर 100 टक्के ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यात यावीत, पंढरपूर येथील चंद्रभागा अन् आळंदी येथील इंद्रायणी नदीत सांडपाणी सोडण्यास बंदी घालावी, हिंदूंची भूमी-मंदिरे बळकावणारा ‘वक्फ’ कायदा रहित करावा, जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कायक्रम अंमलबजावणी समितीच्या सहअध्यक्ष पदावरून शाम मानव यांची तात्काळ हकालपट्टी करावी, देशात समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा करावा यांसह विविध ठराव या अधिवेशनात या प्रसंगी करण्यात आलेले विविध ठराव घेण्यात आले.
पंतप्रधानांनी ‘वक्फ बोर्ड’ रहित करण्याची घोषणा दिल्यावर काही लोकांनी या विरोधात आता रस्त्यावर उतरून विरोध करण्याची सिद्धता केली. त्यामुळे हिंदूंनीही यापुढील काळात त्याला त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची सिद्धता ठेवली पाहिजे, तसेच यापुढील काळात ‘हिंदू-हिंदू, भाई-भाई’ हीच घोषणा आपण दिली पाहिजे.’’ प.पू. गोविंददेव गिरी पुढे म्हणाले, ‘‘समाजाला, देशाला तारुन जाण्यासाठी, लोकांना जागवण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हा एकच शब्द पुरे आहे. त्यामुळे मी ‘शिवचैतन्य जागरण यात्रा’ चालू केली आहे. महाराष्ट्रात गेल्या ७०० वर्षांपेक्षा अधिक काळ वारकरी संप्रदाय-संत परंपरा यांनी लोकांना जागृत करण्याचे मोठे कार्य केले आहे.