नाशिक : पैठणी साडी हा स्त्रियांसाठी फारच आवडीचा असा पेहराव. मात्र पैठणीचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या येवल्यातच पैठणींची चोरी झाली येवला नगर, नगर मनमाड महामार्गावरील लक्कडकोट पैठणी दुकानातून अज्ञात चोरट्यानी सुमारे दीड कोटी रुपयांच्या पैठणी साड्या चोरून नेल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून येवला शहर व परिसरातून दुचाकी व किरकोळ चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. मात्र, इतकी मोठी घटना घडल्याने पोलीस विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा छडा लावण्यासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र, श्वान पथकाने फक्त महामार्गापर्यंत माग दाखवला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवारी, (दि. २६) रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मनमाड नगर महामार्गावर असलेल्या लक्कडकोट पैठणी मध्ये दुकानाच्या पाठीमागील खिडकीचे ग्रील तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील सुमारे दीड कोटी रुपयांच्या पैठणी साड्यांसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील चोरट्यांनी चोरून नेला. अशी माहिती संचालक सुनील लक्कडकोट यांनी दिली. दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन, शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन, सहाय्यक निरीक्षक नितीन लोखंडे आदींनी भेट देवून माहिती घेतली. या प्रकरणी शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.