नवी दिल्ली : बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील अंतरिम सरकारने तेथील अल्पसंख्याक हिंदू नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदार घ्यावी, अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम् जयशंकर यांनी लोकसभेत दिली. बांगलादेशात हिंदूंसह अल्पसंख्यांकावर होणाऱ्या हिंसाचाराबद्दल लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर यांनी ही माहिती दिली. परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की, ढाक्याच्या तंतीबाजार येथील पूजा मंडपावर झालेला हल्ला आणि दुर्गापूजे दरम्यान सातखीरा येथील काली मंदिरात झालेल्या चोरीबाबत सरकारने आपली गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या हल्ल्यांनंतर, बांगलादेश सरकारने दुर्गा पूजा शांततेत साजरी करण्यासाठी लष्कर आणि सीमा रक्षक बांगलादेशच्या तैनातीसह विशेष सुरक्षा प्रदान करण्याच्या सूचना जारी केल्या होत्या. ते म्हणाले की, ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालय बांगलादेशातील अल्पसंख्याकांशी संबंधित परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. बांगलादेश सरकारची अल्पसंख्यांकांसह बांगलादेशातील सर्व नागरिकांच्या जीवनाचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची प्राथमिक जबाबदारी आहे.
दुसरीकडे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी बांगलादेश सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, हिंसाचाराच्या वाढत्या घटना ही केवळ माध्यमांची अतिशयोक्ती म्हणून नाकारता येणार नाही. आम्ही बांगलादेशला अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याचे आवाहन करतो. परराष्ट्र मंत्री म्हणाले की, ऑगस्ट 2024 पासून जेव्हा शेख हसीना यांना बांगलादेशातून जाण्यास भाग पाडले गेले. तेव्हापासून हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांविरूद्ध हिंसाचाराच्या अनेक घटना पाहिल्या आहेत. बांगलादेशात नुकत्याच झालेल्या दुर्गा पूजा उत्सवादरम्यान मंदिरे आणि पूजा मंडपांवर हल्ले झाल्याच्या बातम्याही समोर आल्याचे त्यांनी सांगितले.
भारत सरकारने या घटना गांभीर्याने घेतल्या आहेत आणि आपल्या चिंता बांगलादेश सरकारला सांगितल्या आहेत. बांगलादेशातील चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेचा आणि तुरुंगात टाकल्याचा निषेध करताना ते म्हणाले की, इस्कॉन ही जागतिक स्तरावर सामाजिक सेवा करणारी प्रतिष्ठित संस्था आहे. चिन्मय दासच्या अटकेबाबत आम्ही आमचे म्हणणे मांडले आहे. आम्ही अपेक्षा करतो की या प्रक्रिया निष्पक्ष, निःपक्षपाती आणि पारदर्शक रीतीने हाताळल्या जातील, त्यांचा आणि सर्व संबंधितांचा पूर्ण आदर केला जाईल असे जयस्वाल म्हणाले.