रत्नागिरी : नवीन वर्षातील या संस्थांना भेटी देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन स्तरावरून नियोजन सुरू झाले आहे. गेल्या दोन वर्षांत या संस्थांची सफर विद्यार्थ्यांना घडविण्यात आली होती. त्यामध्ये ‘नासा’ भेटीसाठी १ कोटी ९५ लाख, तर ‘इस्रो’ भेटीसाठी ४० लाखांची तरतूद प्रशासनस्तरावर करण्यात आली आहे. चाळणी परीक्षेनंतर विद्यार्थ्यांची या सफरीसाठी निवड केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ संशोधनाबाबत जिज्ञासा निर्माण व्हावी या हेतूने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ आणि अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ यांची सफर घडविली जाणार आहे. त्याकरिता ७० मुलांची निवडप्रक्रिया सुरू झाली आहे.
यावर्षीही जिल्हा परिषदेमार्फत “नासा” व ‘इस्रो’ भेटी देण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रशासनस्तरावर नियोजन सुरू आहे. त्यासाठी केंद्रस्तरावर विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेतली जाणार आहे. गेल्या वेळी अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हा परिषद शाळास्तरावर २५१ केंद्रांवर २० हजार ५११ विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. त्यातून ५० विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. त्यातील २० मुले “नासा”साठी निवडली गेली होती. आताही २० मुले “नासा”साठी तर ५० मुले “इस्रो” भेटीसाठी चाळणी परीक्षेतून निवडले जाणार आहेत. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांनी पुस्तकातील वैज्ञानिक गोष्टी वाचल्या होत्या. पण आता या शाळांतील विद्यार्थी ‘नासा’ आणि ”इस्रो’ या अंतराळ संशोधन संस्थांना प्रत्यक्ष भेटीत तेथील संशोधनाची अनुभूती घेत आहेत. सलग दोन वर्षे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रशासनाच्या माध्यमातून या संस्थांना भेटी घडविण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेतील शाळांचा पट वाढवून तो टिकविण्यासाठी तसेच जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविण्याच्या अनुषंगाने सुरू केलेल्या या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे मार्गदर्शन लाभले.