नवी दिल्ली : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांना अखाल तख्तने (शिख पंथातील सर्वोच्च समिती) आज, सोमवारी धार्मिक शिक्षा सुनावली. तत्कालीन अकाली सरकारच्या काळात 2015 मध्ये सरकारकडून झालेल्या चुकांची कबुली दिल्यानंतर अखाल तख्तने बादल यांच्यासह तत्कालीन सरकारमधील मंत्र्यांना अमृतसरमधील स्वर्ण मंदिरातील शौचालय साफ करणे, लंगरमध्ये सेवा देणे आणि भांडी धुण्याची शिक्षा सुनावली. याशिवाय, अकाल तख्तचे जथेदार ग्यानी रघुबीर सिंह यांनी शिरोमणी अकाली दलाच्या कार्यकारिणीला सुखबीर बादल यांचा राजीनामा 3 दिवसांत स्वीकारुन अकाल तख्त साहिबला अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, शिरोमणी अकाली दलाच्या कार्यकारिणीला सदस्यत्व मोहीम सुरू करून 6 महिन्यांत नवीन अध्यक्ष निवडण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भातील माहितीनुसार, सुखबीर सिंह बादल यांना अकाल तख्तने दोन महिन्यांपूर्वीच ‘तनखैय्या’ (धार्मिक गैरवर्तनासाठी दोषी) घोषित केले होते. अकाली सरकारच्या काळात वादग्रस्त धर्मगुरू डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम याला देण्यात आलेली माफी लक्षात घेऊन अकाल तख्तने माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांना दिलेली ‘फकर-ए-कौम’ पदवी परत घेतली आहे. सलाबतपुरा येथे 2007 मध्ये डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम याने गुरू गोविंद सिंग यांच्यासारखे कपडे घालून अमृत शिंपडण्याचे नाटक केले होते.
याप्रकरणी राम रहीनविरुद्ध पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला होता. पण राम रहीमला शिक्षा होण्याऐवजी अकाली सरकारने त्याच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले. त्यानंतर आता आज, सोमवारी अकाल तख्त येथे 5 सिंग साहिबांची बैठक झाली, ज्यामध्ये बादल यांच्यासह अकाली सरकारच्या काळातील मंत्रिमंडळ सदस्यांनाही धार्मिक गैरवर्तनाच्या आरोपाखाली शिक्षा सुनावण्यात आली आहे. बादल यांच्यावर सरकारमधील जातीय मुद्द्यांवरुन लक्ष वळवणे,शीख तरुणांवर अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना बढती देणे, राम रहीमवर दाखल झालेला गुन्हा मागे घेणे, जथेदारांना चंदीगड येथील निवासस्थानी बोलावून राम रहीमला माफ करण्यास सांगणे, पवित्र प्रतिमांची चोरी आणि विटंबनाच्या प्रकरणांचा तपास न करणे, संगतांवर लाठीचार्ज आणि गोळीबार करणे, तरुणांवरील अत्याचाराच्या चौकशीसाठी कोणतीही समिती स्थापन न करणे हे प्रमुख आरोप ठेवण्यात आले होते.