महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी सोयी सुविधांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; 6 डिसेंबरला मुंबईत केली सुटी जाहीर

0

* सर्व यंत्रणांनी समन्वयातून काम करावे, देशभरातून येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी
* महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुटी- -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमी येथे येतात. त्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुटी जाहिर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी करावयाच्या सोयी सुविधांचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. या बैठकीस माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.गोविंदराज, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंग, सामाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, कोकण विभागीय आयुक्त डॉ.राजेश देशमुख, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्यासह संबंधित विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यांना भोजन, स्वच्छ आणि पुरेशी स्वच्छतागृहे, वैद्यकीय सुविधा, राहण्याची सुविधा, वाहतूक व्यवस्था, मदत आणि समन्वय कक्ष, सुरक्षा व्यवस्था आदी सोयी सुविधा पुरविण्यात येतात. या सुविधा पुरविताना कोणत्याही अनुयायाची गैरसोय होणार नाही, याची सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

महापरिनिर्वाण दिनाशी संबंधित सर्व समित्यांचे याकामी नेहमीच सहकार्य राहिले आहे, त्यांच्या सूचनांची दखल घेऊन सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चैत्यभूमीवर पुष्पवृष्टी करण्याचे नियोजन करण्यात यावे. परिसरात पूर्ण स्वच्छता राखण्यात यावी. विविध रेल्वे स्थानकांवर मदत कक्ष उभारण्यात यावेत, अशा सुचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.

माजी उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले, की दरवर्षी आपण चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करतो. यावर्षीही सुद्धा कोणतीही कमतरता राहणार नाही, याची काळजी घ्यावी. सर्वानी समन्वयाने प्रयत्न करावेत. भोजन, आरोग्य, पाणी, स्वच्छता तसेच सुरक्षा आदी सुविधा दर्जेदार द्यावेत. स्थानिक समित्यांचे नेहमीच सहकार्य राहते. त्यांच्या सूचनांही योग्य प्रकारे अमंलात आणणव्यात. अनुयायी संवेदना व्यक्त करायला येतात. संवेदनशीलता ठेवून शासनाच्या माध्यमातून चांगल्या प्रकार नियोजन करावे, अशा सूचना देऊन फडणवीस यांनी यावेळी विविध सुविधांबाबतची माहिती घेतली आणि त्याबाबतच्या नियोजनाबाबत समाधानही व्यक्त केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech