मुख्यमंत्री पदाची कोंडी

0

( नितिन सावंत )

————

23 नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले तरीसुद्धा मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिंदे सेना यांच्यामध्ये चढाओढ लागली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत महायुतीला अनपेक्षित असे यश मिळाल्यानंतरही यशाचा खरा मानकरी कोण? यावरून या दोन पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. मात्र तिसरे साथीदार अजित पवार हे उपमुख्य मंत्रीपदावर समाधानी असून त्यांनी या स्पर्धेत अजिबात भाग घेतलेला नाही. या निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या असे शिंदेसेनेचे मत आहे तर या निवडणुका महायुती म्हणून लढल्या गेल्या त्यामुळे हे हे यश एकट्या एकनाथ शिंदे यांचे नाही, असे मत भाजपचे आहे.
एकट्या भाजपला 132 जागा मिळाल्यानंतर ते काही मुख्यमंत्री पदाचा दावा सोडतील असे वाटत नाही मात्र 56 आमदार निवडून आलेल्या शिंदे सेनेला मुख्यमंत्रीपद हवे आहे. यापूर्वी महायुतीच्या दिल्लीतील बैठकीतही भाजप नेत्यांनी मुख्यमंत्रीपदावर भाजपचाच उमेदवार येईल हे स्पष्ट केल्याने शिंदे सेनेत नाराजी सुरू आहे.
अडीच वर्षांपूर्वी राज्यातील शिवसेना संपवण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासोबत चाळीस आमदार असताना त्यांना मुख्यमंत्रीपद दिले होते मात्र विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजपला शिंदे सेनेची गरज राहिलेली नाही हे विधानसभा निवडणूक निकालाचे बलाबल पाहिले असता लक्षात येते. मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना त्यावेळी दिले गेले असले तरी सर्व निर्णय हे दिल्लीहूनच होत असत, हे सर्व महाराष्ट्राने पाहिले आहे. आता भाजपला शिंदे यांची गरज नाही तर एकनाथ शिंदे यांना भाजपची गरज आहे. मुख्यमंत्रीपद नाकारल्यानंतर काही वेगळे पाऊल उचलण्याचा तर प्रश्नच येत नाही. कारण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 41 आमदार असल्याने ही संख्या 172 एवढी होत आहे. त्यामुळे भाजपला एकनाथ शिंदे यांना चुचकारण्याची गरज उरलेली नाही. शिंदे सेनेला मुख्यमंत्रीपद नाकारल्यानंतर आता त्यांनी गृहमंत्री पदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र भाजप हा पक्ष थंड डोक्याने आपल्या मित्रांचा गळा कापत असतो हे शिंदे यांच्या लक्षात आलेले नाही. 24 नोव्हेंबर रोजी निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे यासाठी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, नगरचे गणेश मंदिर आणि नागपूरच्या टेकडी गणेशाला शिंदे सेनेच्या मंडळींनी साकडे घातले. दुसऱ्या दिवशी वर्षावर लाडक्या बहिणींना बोलावून एकनाथ शिंदे शक्ती प्रदर्शन करणार होते. परंतु भाजपच्या दिल्लीतील नेत्यांकडून दट्ट्या आल्यानंतर लाडक्या बहिणींचे शक्ती प्रदर्शन रद्द करण्यात आले. या दोन घटनांनंतर मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना मिळणार नाही हे स्पष्ट झाले.
गेले अडीच वर्षे डिमोशन स्वीकारून उपमुख्य मंत्रीपदाचा गाडा हाकणारे देवेंद्र फडणवीस हे यावेळी शांत होते. त्यांनी महायुतीचा मुख्यमंत्री होईल एवढीच प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे दिल्लीतील भाजप नेत्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. दिल्लीतील पहिल्या महायुतीच्या बैठकीत आपण मुख्यमंत्री होणार नाही हे निश्चित झाल्यानंतर एकनाथ शिंदे आपल्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावी निघून गेले. त्यादिवशी अमावस्या असल्याने अमावस्येची पूजा करण्यासाठी ते गावी गेले होते असे त्यांचे निकटवर्तीय खाजगीत सांगत आहेत. मात्र या पूजेनंतरही त्यांच्या मनासारखे घडलेले नाही.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या समर्थकांना आता गृहमंत्री पदासाठी मोर्चे बांधणी करा असे सांगून स्वतः ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. मात्र ही मोर्चे बांधणीही त्यांच्या अंगाशी येणार आहे. भाजपने नगर विकास, गृह आणि महसूल ही तीनही खाती शिंदेसेनेला देण्यास नकार दिला आहे. फार फार तर गृहनिर्माण खाते देऊ असे त्यांना सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विधानसभा अध्यक्षपदही भाजपकडेच राहणार आहे.
गेली अडीच वर्षे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार यांनी सहाव्या मजल्यावर घातलेला गोंधळ भाजपला चांगलाच माहीत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांच्या मंत्र्यांवर आणि आमदारांवर चांगलाच कंट्रोल होता. फक्त राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. गावित या दोन मंत्र्यां व्यतिरिक्त कोणीही एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट जात नसत. एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना जो राजकीय त्रास दिला त्याची आता परतफेड होणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आपल्याला आशीर्वाद असल्याने एकनाथ शिंदे जरा हवेतच होते. परंतु विधानसभा निकालानंतर त्यांचे विमान जमिनीवर आले आहे.
मुख्यमंत्री पदासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्यानंतर मराठा फॅक्टरचा काही परिणाम होईल का ?याचा अंदाज गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडून घेतला. त्यावेळी विनोद तावडे यांनी सांगितले की मराठा फॅक्टरचा अजिबात परिणाम होणार नाही. त्याचवेळी फडणवीस यांचे नाव निश्चित झाले होते.

———-

 ( लेखक प्रथितयश  ज्येष्ठ पत्रकार असून नामवंत राजकीय विश्लेषक आहेत)

– 9892514124

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech